राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरासोबतच त्यांच्याशी संबंधित एकूण ६ ठिकाणी आयकर विभागानं शुक्रवारी सकाळी छापा टाकला. अजूनही आयकर विभागाची चौकशी सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून भाजपावर आयकर विभागाचा गैरवापर करून राजकीय हेतूने ही कारवाई केली जात असल्याची टीका सुरू केली आहे. त्यासंदर्भात आता भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दांत टीका केली आहे. “राज्यात सध्या एक घोषित गृहमंत्री आहेत आणि एक अघोषित गृहमंत्री आहेत. एक नामधारी गृहमंत्री आहेत, एक कार्यकारी गृहमंत्री आहेत. अशा प्रसंगामध्ये पोलीस विभागाला दिशाच राहिली नाही. मग काही पोलीस अधिकारी ज्या पद्धतीने बेताल वागत आहेत”, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.

“हा चौथ्या स्तराचा कर्करोग!”

अनिल देशमुख यांच्यावर होत असेलल्या आयकर विभागाच्या कारवाईकडे राजकीय भावनेतून पाहू नये, असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले. तसेच, खंडणी प्रकरणी राज्य सराकरवर परखड शब्दांत टीका केली. “खंडणीखोरांनी देखील यांची कृती पाहून आत्महत्या करावी, अशी स्थिती आहे. अशा वागणुकीची चौकशी करणं गरजेचं आहे. कारण हा देखील एक मोठा धोका आहे. पोलिसांचं गुन्हेगारीकरण होणं किंवा पोलिसांचं राजकीयीकरण होणं हा राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी चौथ्या स्तराचा कर्करोग आहे. म्हणून या प्रसंगात सखोल चौकशी केली जात आहे. त्याकडे आपण दोषपूर्ण नजरेनं न पाहाता महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे”, असं मुनगंटीवार म्हणाले.

“देशात नाही, जगात असं पहिल्यांदात घडतंय”

मुनगंटीवार यांनी आपल्या ट्वीटर हँडलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये यासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. “या कारवाईमध्ये कुणाला त्रास देण्याचं काही कारण नाही. ते निर्दोष असतील, तर काळजी करण्याचं कारण नाही. राज्यात स्वातंत्र्यानंतर असं पहिल्यांदाच घडत असेल, की कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे माजी गृहमंत्री फरार आहेत. ज्यांच्याकडे या देशाच्या आर्थिक राजधानीची जबाबदारी होती, ते माजी पोलीस आयुक्तही फरार आहेत. हे देशातच नाही तर कदाचित जगात पहिल्यांदा घडत असेल”, असं ते म्हणाले.

 

आयकर विभागाने नागपूरमधील अनिल देशमुखांच्या घरासोबतच नागपूर विमानतळाजवळील त्यांचं हॉटेल, सोयाबीन केकची फॅक्टरी, एनआयटी कॉलेजमध्ये देखील आयटीच्या पथकानं छापेमारी केली आहे. यासोबतच, त्यांच्या तीन भागीधारांपैकी काद्री आणि भटेवार यांची देखील आयकर विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.

Story img Loader