हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर त्यावरून विरोधकांनी गदारोळ केला. आधी भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या विरोधकांनी नंतर त्यांनी माफी मागावी अशी मागणी सभागृहात केली. या मुद्द्यावरून वाद सुरू असताना भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं झालं काय?

ऊर्जामंत्री नितीन राऊत वीज कनेक्शनच्या मुद्द्यावरून लक्षवेधीवर उत्तर देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ लाख रुपये नागरिकांच्या खात्यात जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं असा उल्लेख केला. त्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यावेळी भास्कर जाधव यांनी उभं राहात पंतप्रधानांची नक्कल करून दाखवली. यावरून सभागृहातलं वातावरण चांगलंच तापलं.

भास्कर जाधवांनी केली नक्कल

“२०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी १०० वेळा म्हणाले आहेत की ‘काला धन लाने का के नहीं लाने का? तो लाने का.. लाने का तो कहाँ रखने का? यू ही रखने का’ असं ते बोलले आहेत”, असं भास्कर जाधव नक्कल करत म्हणाले.

भास्कर जाधवांनी केली नरेंद्र मोदींची नक्कल, विधानसभेत खडाजंगी; फडणवीसांनी केली निलंबनाची मागणी!

सुधीर मुनगंटीवारांची आगपाखड

यावर बोलताना भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधारी पक्षांवर टीका केली. “अध्यक्ष महोदय, आपल्याकडून इतक्या गंभीर विषयावर निर्णय अपेक्षित आहे. ही प्रथा अतिशय वाईट आहे. भास्कर जाधव यांची ही काही पहिलीच वेळ नाही. विधानसभेच्या बाहेर तुम्ही एखाद्या नेत्याची नक्कल केली, तर ती आपल्या लोकशाहीत माफ करण्यायोग्य नाही, पण त्याचा निर्णय निवडणुकीत होईल. पण विधानसभेत असं काही करणं, चुकीचं आहे”, असं मुनगंटीवार म्हणाले.

“..तर तो देशाचा अपमान नाही का?”

“याआधी १८ डिसेंबर २०१९ रोजी देवेंद्र फडणवीस शरद पवारांविषयी सामनामधलं एक भाषण वाचत होते. अध्यक्ष म्हणाले, असं वाचता येणार नाही. कारण ते नेते आहेत. त्यानंतर देखील मुख्यमंत्र्यांबद्दल एका हिंदू वृत्तपत्राने काहीतरी शब्द वापरले, तर अध्यक्ष म्हणाले हा मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. मग पंतप्रधानांबद्दल बोललं, तो देशाचा अपमान होत नाही का? त्यानंतर अध्यक्ष म्हणाले, सभागृहापेक्षा कुणी मोठा नाही. मग हे सदस्य सभागृहापेक्षा मोठे आहेत का?”, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.

पंतप्रधानांची नक्कल केल्यानंतर भास्कर जाधवांची बिनशर्त माफी; पण फडणवीसांना टोला लगावत म्हणाले, “आम्ही एकाच शाळेत…!”

“मी यांच्यापेक्षा चांगल्या नकला करू शकतो”

“अशा धंद्यांमुळे पुढच्या निवडणुकीत हे नक्की पडतील. मी तुम्हाला शब्द देतो, की हे रेकॉर्डमधून काढलं नाही, तर यांच्यापेक्षा चांगल्या नकला मी करू शकतो. हे काय नकला करतात. आमच्यावर संस्कार आहेत. अशांना आम्ही पुस्तकं दाखवतो. हे असं खोटं बोल पण ठरवून बोल, काहीतरी गोंधळ करायचा हे असं नाही चालत. तुम्ही तर्कावर तर्क द्या. हे असं नाही चालणार”, असं मुनगंटीवारांनी म्हणताच विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.

अखेर सभागृह काही काळासाठी तहकूब करावं लागलं. नंतर सभागृह सुरू झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी सभागृहाची बिनशर्त माफी मागत असल्याचं जाहीर केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp sudhir mungantiwar on bhaskar jadhav narendra modi mimicry devendra fadnavis pmw