मंत्रीमंडळ विस्तारानंतर रखडलेले खातेवाटप अखेर रविवारी जाहीर झाले. गृह, अर्थ, महसूल, ग्रामविकास, जलसंपदा, सहकार, उर्जा, गृहनिर्माण ही सर्व महत्त्वाची खाती भाजपाने स्वत:कडे ठेवून सरकारमधील आपलं वर्चस्व अधोरेखित केलं. यानंतर विरोधकांकडून शिंदे गटाला दुय्यम खाती दिल्याची चर्चा होत आहे. यावर वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्सव्यवसाय या खात्यांचा पदभार मिळालेले सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भाजपला झुकते माप ; खातेवाटपात गृह, अर्थ, महसूलसह महत्त्वाचे विभाग
“शिवसेनेकडे जी खाती होती ती त्यांच्याकडे आहेत. भाजपाने चांगली खाती घेतली असं म्हणण्याला काही अर्थ नाही. भाजपाकडे जी खाती आहेत, ती शिवसेनेने विचारपूर्वक, चिंतन करुन काँग्रेस, राष्ट्रवादीला दिलेली खाती आहेत. तेव्हा तेही सरकारमध्ये दुसऱ्या भूमिकेत होते आणि सध्या आम्ही आहोत. शिवसेनेने यावर टीका करणं म्हणजे आपल्याकडे राजकीय निर्णय घेण्याची क्षमता नाही म्हणत निंदा करुन घेण्यासारखं आहे,” अशी टीका मुनगंटीवारांनी केली.
कोणाला कोणतं खातं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खातं कायम ठेवलं असून, गृह आणि अर्थ ही सर्वात प्रभावी खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. आधीच्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये शिवसेनेकडे असलेल्या मंत्र्यांची खाती शिंदे गटाकडे कायम ठेवण्यात आली आहेत. राष्ट्रवादीकडे असलेली सर्व प्रभावी आणि मलईदार खाती भाजपाच्या वाटय़ाला गेली आहेत. शिंदे गटाकडे नगरविकास, परिवहन, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, कृषी, सार्वजनिक बांधकाम (रस्ते विकास मंडळ), पणन, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, अल्पसंख्याक, उद्योग, पाणीपुरवठा, बंदरे, खाणकाम, अन्न व औषधे प्रशासन, शालेय शिक्षण ही खाती आली आहेत.
खातेवाटप योग्य प्रकारे! ; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा
गृह, अर्थ, महसूल, सहकार, उर्जा, गृहनिर्माण, जलसंपदा, ग्रामविकास, आदिवासी विकास, वैद्यकीय शिक्षण ही सर्व महत्त्वाची खाती भाजपाकडे राहणार आहेत. भाजपामध्ये खातेवाटपाच्या यादीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र निकटवर्तीयांच्या वाटय़ाला महत्त्वाची खाती आली आहेत. मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य ही खाती सोपविण्यात आली आहेत. आधीच्या फडणवीस सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांनी महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकारसारखी महत्त्वाची खाती भूषविली होती. या तुलनेत उच्च व तंत्रशिक्षण वा वस्त्रोद्योग ही दुय्यम खाती मानली जातात. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे त्यावेळी अर्थ आणि वने ही खाते होती. आता त्यांच्याकडे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्सव्यवसाय या खात्यांचा पदभार सोपविण्यात आला आहे.
औरंगाबादच्या अतुल सावे यांच्याकडे सहकार आणि इतर मागास व बहुजन कल्याण ही खाती सोपवून मराठवाडय़ात नवे नेतृत्व पुढे आणण्याच्या दृष्टीने भाजपने पाऊल टाकलं आहे. मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याबद्दल टीका होत असतानाच महिला आणि बालविकास हे खाते मुंबईतील नामांकित विकासक मंगलप्रभात लोढा यांच्याकडे देण्यात आले असून, पर्यटन आणि कौशल्य विकास ही अन्य दोन खातीही त्यांच्याकडे आहेत. गिरीश महाजन यांच्याकडील पूर्वीचे वैद्यकीय शिक्षण खाते कायम ठेवण्यात आलं असून, ग्रामीण भागात पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे ग्रामविकास व पंचायती राज हे खातं सोपविण्यात आलं आहे. वादग्रस्त अशी प्रतिमा असलेल्या डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे आदिवासी विकास हे खाते सोपवून आदिवासी भागात भाजपची ताकद वाढविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.