नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पातळीवर भाजपाप्रणीत एनडीएला बहुमत मिळालं आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झालं. मात्र, एनडीएला ४०० पार व भाजपाला ३७० पार गाठता आले नाहीत. भाजपाला २६० जागांपर्यंतच मजल मारता आली. महाराष्ट्रातही भाजपाची मोठी पीछेहाट झाली. या पार्श्वभूमीवर अजित पवारांमुळे पक्षाला फटका बसल्याची टीका संघाचं मुखपत्र मानल्या जाणाऱ्या ‘ऑर्गनायझर’मधून करण्यात आली. त्यापाठोपाठ ‘विवेक’ साप्ताहिकातूनही अशी भूमिका मांडण्यात आल्यानंतर भाजपाच्या भूमिकेकडे आता साऱ्यांचं लक्ष आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या युतीचं बहुमताचं सरकार असताना अजित पवार गटाला सोबत घेण्याचा निर्णय घेतला. अजित पवार सरकारमध्ये सामीलही झाले. पण त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचं आता बोललं जात आहे. यासंदर्भात ‘ऑर्गनायझर’ व ‘विवेक’मधील लेखांनंतर भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेविषयी पक्षाचे राज्यातील एक महत्त्वाचे नेते व राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी यावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

भाजपाची अजित पवारांबाबत भूमिका काय?

अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे पक्षाचं नुकसान होत असल्याची टीका होत असताना भारतीय जनता पक्षानं मात्र ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’चा नारा दिला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही ९ शी बोलताना यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. “‘विवेक’ साप्ताहिकामध्ये काही छापून आलं ते त्यांचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे. त्यांनी आपलं मत मांडलं. भाजपानं अजित पवारांना सोबत घेताना एक विचार करून घेतलं आहे. आता सोबत आहेत ते. त्यामुळे साथ निभाना है. ये यारी हम नहीं तोडेंगे. आता एकत्र आलोय तर पुढे जायचं”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

मुनगंटीवार यांच्या या भूमिकेमुळे आता आगामी निवडणुकांमध्ये अजित पवार हे महायुतीमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र, राजकीय अनिश्चिततेच्या अनेक घटना गेल्या पाच वर्षांत घडल्यामुळे अजित पवारांच्या राजकीय भवितव्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

काय म्हटलंय ‘विवेक’ साप्ताहिकातील लेखात?

विवेक साप्ताहिकात छापून आलेल्या लेखामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सुमार कामगिरीचं खापर अजित पवार गटावर फोडल्याचं दिसून येत आहे. ‘कार्यकर्ता खचलेला नाही, तर संभ्रमात’, असं या लेखाचं शीर्षक आहे. “लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना वा आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून. राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपाच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही हे स्पष्ट आहे. याची जाणीव भाजपा नेत्यांना नाही असे नाही”, असं या लेखात नमूद करण्यात आलं आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरची युती भोवली”; संघाच्या ‘विवेक’ साप्ताहिकाने भाजपाला विचारले बोचरे प्रश्न

“आज पक्षाच्या मूळ कार्यकर्त्याला स्थान काय आणि पक्षामध्ये बाहेरून आलेल्यांना स्थान काय, याचा साकल्याने विचार होण्याची गरज आहे. कित्येक कार्यकर्ते असे आहेत, की जे आपापल्या नोकरी-व्यवसाय-उद्योगात प्रचंड यशस्वी आहेत, त्यांना कोणत्याही राजकीय लाभाची गरज नाही तरी एक विचारधारा म्हणून आपापल्या परीने ते हिंदुत्वाशी संबंधित काही ना काही काम करत आहेत. त्यांचे म्हणून आपापल्या भागांत एक प्रभावक्षेत्र आहे, ’नेटवर्क’ आहे. या मंडळींना ’आमचे स्थान काय’ असे म्हणताना आमच्या मताला, म्हणण्याला स्थान काय, असा अर्थ अभिप्रेत होता”, असंही लेखात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp sudhir mungantiwar on vivek article targeting ajit pawar ncp pmw