राज्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. एकीकडे मुंबईतील एका मैदानाला टिपू सुलतान यांचं नाव देण्यावरून भाजपाकडून तीव्र आक्षेप घेतला जात असताना आता राज्य मंत्रिमंडळाच्या एका नव्या निर्णयावरून देखील भाजपाकडून तीव्र शब्दांत नापसंती दर्शवली जात आहे. यापुढे एक पाऊल जात भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना हे पूर्णपणे बेवड्यांना समर्पित सरकार असल्याची टीका केली आहे. आज राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या एका निर्णयाची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्यानंतर त्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
काय आहे निर्णय?
राज्यात सुपर मार्केटमध्ये शोकेसमध्ये वाईनची विक्री करता येणार असल्याचा निर्णय नवाब मलिक यांनी आज संध्याकाळी जाहीर केला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यामध्ये १००० चौरस फुटांच्या सुपर मार्केटमध्ये ही विक्री करण्यास परवानगी देण्यात आल्याचं ते म्हणाले. वायनरीजसाठी लागणाऱ्या फळांचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असं देखील नवाब मलिक यांनी नमूद केलं आहे.
“मस्त पियो, खूब जियो”
दरम्यान, या निर्णयावरून सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “मस्त पियो, खूब जियो हा या सरकारचा मंत्र आहे. हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित आहे. करोनामध्ये सर्वसामान्यांना औषधीची आवश्यकता आहे. पण दवा नहीं, हम दारू देंगे, महाराष्ट्र को मद्यराष्ट्र बनाएंगे हा या सरकारचा निर्णय आहे. करोनामध्ये कष्टकऱ्यांसाठी निर्णय घ्यायला यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत वेळ नाही. राजकारण करणे आणि दारूवाल्यांना प्रोत्साहन देणे ही यांची भूमिका आहे”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
“चंद्रपूरची दारूबंदी हटवली. वाईन प्रोत्साहन योजनेसाठी चार वर्ष आम्ही पैसे दिले नव्हते. ते पैसे करोनाच्या आर्थिक संकटातही दिले. यांनी ३०० टक्के असलेला विदेशी दारूवरचा कर कमी करू १५० टक्के केला. स्वस्त दारू दिली पाहिजे. वीज स्वस्त असण्याचं कारण नाही, पण दारू स्वस्त दिली पाहिजे”, असं मुनगंटीवार खोचकपणे म्हणाले.
राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यास परवानगी – नवाब मलिक
“…तर मंत्रीमंडळ बैठकीत वाईन सुरू करा”
दरम्यान, यातून शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याच्या राज्य सरकारच्या दाव्यावर मुनगंटीवारांनी तीव्र आक्षेप घेतला. “शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे. हा वाईन उद्योजकांना फायदा होणार आहे. आपल्या राज्याती वाईन उद्योजक एका कंपनीचे सर्व बटीक आहेत. त्या कंपनीची पोहोच एवढी आहे, की ती मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्याला साजेसा निर्णय करवून घेऊ शकते. आई आपल्या १२-१३ वर्षांच्या मुलाला सुपर मार्केटमध्ये पाठवेल, तर तिथे तुम्ही वाईन पाजायची. जर शेतकऱ्यांच्या फायद्याची चिंता असेल, तर मंत्रिमंडळ बैठकीत तुम्ही चहा बंद करा, वाईन सुरू करा”, असं देखील मुनगंटीवार म्हणाले.