राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाचं मंगळवारी सूप वाजलं. अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि नाट्यमय घडामोडींनी शेवटचा दिवस देखील गाजला. शेवटच्या दिवशी मंजूर करण्यात आलेल्या विद्यापीठ सुधारणा विधेयकावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यासोबतच राज्यपालांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीला नाकारलेली परवानगी आणि राज्य सरकारला पाठवलेल्या पत्राचीही जोरदार चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर आता भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

“बाळासाहेबांना अटक करणाऱ्यांनाच खुर्ची दिली”

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसी छगन भुजबळांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात व्यत्यय आणून तीव्र आक्षेप घेतला होता. यावर मुनगंटीवारांनी शिवसेनेला सुनावलं आहे. बाळासाहेब ठाकरेंना अटक करणारे, ५०५/2 चा गुन्हा बाळासाहेबांवर दाखल करून त्यांना अटक करण्यात पुढाकार घेणारे छगन भुजबळ. तेव्हा बाळासाहेबांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की याला ताबडतोब मंत्रिमंडळातून बरखास्त करा. हे शिवसैनिकांचं दुर्दैव आहे की ज्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे दैवतासमान आहेत, त्यांच्या चिरंजीवांनी पित्याच्या कधीही कुणी न पाहिलेल्या शपथेचा दाखला देत बाळासाहेबांनी सांगितल्याच्या विरोधी कृती करत त्यांना (भुजबळांना) मांडीला मांडी लावून मंत्रिपदाची खुर्ची उपलब्ध केली. महाराष्ट्र बघतोय”, असं मुनगंटीवार म्हणाले.

“मी उद्धव ठाकरेंना धन्यवाद देतो की..”

“१ मे १९६० पासून अधिवेशनात मुख्यमंत्री नाहीत असं एकही अधिवेशन नसेल. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धन्यवाद देतो, की त्यांनी हा सुद्धा रेकॉर्ड मोडण्याचं काम केलं. मुख्यमंत्री नसणारं हे पहिलं अधिवेशन आहे. विधानसभा अध्यक्ष नाहीत, मुख्यमंत्री नाहीत. एखाद्या चित्रपटात मुख्य स्थानावर उपस्थित नसताना कृती करण्याचे अदेश व्हायचे, ते काल मी पाहिलं”, असं मुनगंटीवार म्हणाले.

“तुमच्या पत्रातील भाषेमुळे मी दु:खी झालोय”, मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपालांनी पाठवलं उत्तर! म्हणाले, “माझ्यावर दबाव..”!

सरकार ऐकायलाच तयार नव्हतं…

“राज्यातल्या २३ पैकी ११ विद्यापीठांमध्ये पारंपरिक शिक्षण देतात. या विद्यापीठांच्या कायद्यात बदल करताना चर्चा व्हावी असं आम्ही म्हणालो. पण सरकार ऐकायलाच तयार नव्हतं. सरकारने लोकशाहीच्या सगळ्या परंपरा मोडीत काढल्या. विरोधी पक्षनेत्याला भाषणात थांबवून छगन भुजबळ साहेब जबरदस्तीने पुढे आले आणि विधानसभेचं कामकाज बंद पाडण्यात पुढाकार घेतला. हे आश्चर्य आहे”, असं मुनगंटीवार म्हणाले.

“राज्यपाल नाराज आहेत तर राज्य सरकार…”, राज्यपालांच्या पत्रानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी स्पष्टच सांगितलं!

१ जानेवारीपासून एल्गार

दरम्यान, येत्या १ जानेवारीपासून भाजपा राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. “आमच्याविरुद्ध कुणी बोललं की त्याला अटक करू अशा अनेक घटना राज्यात घडत आहेत. राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाले आहेत. परिस्थिती चिंताजनक आहे. या परिस्थितीत भाजपानं निर्णय घेतलाय, की या दहशतीच्या विरुद्ध आम्ही आवश्यक तिथे उच्च न्यायालयात जाऊ. या सरकारविरोधात १ जानेवारीपासून एल्गार, शंखनाद करू. या संकल्पाला जनतेनं साथ द्यावी. सर्वसामान्य व्यक्तींनीही यात सहभागी व्हावं”, असं आवाहन मुनगंटीवार यांनी केलं.

Story img Loader