“मी भाजपाचा पुन्हा राज्यात सत्तेत येऊ देणार नाही”, असा निर्धार शरद पवारांनी गुरुवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि नेतेमंडळींना दिला. या मुद्द्यावरून आता भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. शरद पवारांच्या याच विधानाला आता भाजपाकडून खोचक शब्दांत प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. “तुमच्या पक्षाचे ६० पेक्षा जास्त आमदार निवडून आणून दाखवा”, अशा शब्दांत भाजपानं शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये पवारांनी आपल्या पुढील वाटचालीविषयी मार्गदर्शन केलं.
“घाबरू नका”, शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला धीर!
“भाजपाकडून होणाऱ्या आरोपांना घाबरू नका, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ दणार नाही”, असा विश्वास शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, भाजपाकडून परिश्रम घेण्याची तयारी, नियोजन अशा गोष्टी शिकण्यासारख्या असल्याचं देखील पवारांनी यावेळी सांगितलं.
“आदरणीय शरद पवार साहेब…”
दरम्यान, शरद पवारांच्या या विधानावर भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. “आदरणीय शरद पवार साहेब..कोण येणार? कोण नाही हे सर्व महाराष्ट्रातील जनता ठरवते. लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ असते, तुम्ही नाही. जनतेने भाजपला १०५ जागा दिल्या. तुम्ही पावसात भिजूनही त्याच्या अर्धे आमदारही निवडून आणू शकला नाहीत. जनमताचा अनादर करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल”, अशा शब्दांत महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर हँडलवरून शरद पवारांवर निशाणा साधण्यात आला आहे.
“भाजपाची काळजी करू नका”
“शरद पवार साहेब, भाजपची काळजी करू नका! स्वतःच्या पक्षाचे ६० च्या वर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी १० वर्षांत दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे. तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. ५५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा”, असं आव्हान भाजपानं शरद पवारांना दिलं आहे. यावेळी आपनं पंजाबमध्ये मिळवलेल्या विजयावरून देखील भाजपानं शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
शरद पवारांकडून भाजपाचं कौतुक; नेत्यांना म्हणाले “प्रतिस्पर्धी असले तरी त्यांच्यांकडून…”
“आधी हे प्रश्न सोडवून दाखवा”
दरम्यान, भाजपाकडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये शरद पवारांना राज्यातील तीन प्रलंबित प्रश्नांबाबत देखील विचारणा करण्यात आली आहे. “आदरणीय शरद पवारजी, भाजपाला येऊ न देण्याच्या गोष्टी नंतर करा. राज्यात एसटी बंद, ६ महिन्यापासून कर्मचारी संपावर आहेत. राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे, पिकं उभ्या उभ्या करपून जात आहेत. मराठा, ओबीसी आरक्षण.. आधी हे प्रश्न सोडवून दाखवा”, असं भाजपाच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात २०२४मध्ये स्वबळावर सत्ता आणण्याचं जाहीर केलं असताना दुसरीकडे शरद पवारांनी देखील भाजपाला सत्तेत येऊ देणार नाही असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला असल्यामुळे राज्यात पुढील काळात राजकीय नाट्य पाहायला मिळण्याची शक्यता आहे.