पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मुद्द्यावरून खोकच शब्दांत निशाणा साधला होता. “काम झालेलं नसतानाही पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन होत आहे”, असं शरद पवार शनिवारी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते. या मुद्द्यावरून आता भाजपाकडून खोचक शब्दांमध्ये शरद पवारांवर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपा महाराष्ट्रच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शरद पवारांना टोला लगावण्यात आला आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
शनिवारी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी बोलताना पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याचा उल्लेख केला होता. “पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येऊन मेट्रोचं उद्घाटन करत आहेत. कामं होत असतील आणि त्यांचं उद्घाटन होत असेल तर त्यावर तक्रार असण्याचं कारण नाही. ते मेट्रो सुरू करतायत. मला माहिती नाही. महिन्यापूर्वी मेट्रोच्या प्रमुखांनी मला मेट्रो दाखवायला नेलं होतं. पंतप्रधान ज्या मार्गाने जाणार आहेत, त्या रस्त्याने मी देखील गेलो. आमचे काही सहकारी होते. माझ्या लक्षात आलं की हे मेट्रोचं काम काही सगळं झालेलं नाही. मला नुसतं दाखवलं. काम झालं नाही तरी उद्घाटन होत आहे. माझी काही त्याबद्दल तक्रार नाही”, असं शरद पवार म्हणाले होते.
काम झालेले नसतानाही मेट्रोचे उद्घाटन; शरद पवार यांची पंतप्रधान दौऱ्यावर टीका
भाजपाचा निशाणा
दरम्यान, शरद पवारांच्या या विधानानंतर भाजपानं ट्विटर हँडलवरून निशाणा साधला आहे. “आदरणीय शरद पवारजी, पुणे मेट्रोचं काम अर्धवट आहे तर, लोक झोपेत असताना लपून छपून ट्रायल तुम्हीच घेतलं होतं ना? तुमची अडचण इथे आहे की, मोदीजी ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन करतात त्या प्रकल्पाचे लोकार्पण देखील करतात, जे तुम्हाला ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत जमलं नाही”, असं भाजपानं म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (६ मार्च) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय येथे पुणे मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन करून ते मेट्रोने आनंदनगपर्यंतचा प्रवास करणार आहेत. त्यानंतर जवळच्या मैदानावरून जाहीर कार्यक्रमाद्वारे ते पुणेकरांना संबोधित करणार आहेत.