राणे कुटुंब विरुद्ध आमदार भास्कर जाधव यांच्यातील वादामुळे आज (१६ फेब्रुवारी) गुहागरमध्ये वातावरण तापलं आहे. भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर दुपारी दगडफेक करण्यात आली. त्यामुळे चिपळुणात जोरदार राडा झाला असून, राणे आणि जाधव यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. या राड्यामुळे जमलेला जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा मारा केला. त्यामुळे चिपळूणचे राजकारण तापलं आहे. आमदार भास्कर जाधव यांनी अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या कणकवली दौऱ्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे संतापलेल्या माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भास्कर जाधव यांच्यावर सणसणीत टीका केली. त्यांचा समाचार घेण्यासाठी आपण त्यांच्या मतदार संघातच सभा घेऊ आणि तिथेच बोलू, असं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार आज त्यांची शृंगारतळी (ता. गुहागर) जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राणे समर्धक आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. दोन्ही बाजूने दगडफेक झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेची माहिती देताना आमदार भास्कर जाधव म्हणाले, भाजपाचे सरचिटणीस निलेश राणे गुहागरमध्ये, माझ्या मतदारसंघात सभा घेणार अशी जाहिरातबाजी करण्यात आली होती. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात ती व्हायरल करून येथील लोकांना उचकवण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात वेगवेगळे बॅनर लावले होते. ‘गुन्ह्याला माफी नाही’, ‘हिशेब चुकता करणार’, अशा प्रकारच्या आव्हानात्मक भाषेचे बॅनर आणि झेंडे त्यांनी लावले होते. परंतु, आम्ही त्यांच्या झेंड्याला हात लावला नाही. गुहागरला सभा असल्याने राणे मुंबईवरून निघाले. त्यांनी दापोलीमार्गे फेरी बोटीने गुहागरला येणं अपेक्षित होतं. परंतु, ते जाणीवपूर्वक चिपळूणला आले. माझं घर आणि कार्यालयासमोर जाणीवपूर्वक त्यांनी स्वतःचा मोठा सत्कार करण्याची योजना आखली होती. मी पोलिसांना सांगितलं की त्यांचा सत्कार होऊ द्या. परंतु, माझ्या कार्यालयासमोर सत्कार करून अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली जायला हवी. त्यानंतर त्यांनी जवळच्या नाक्यावर हा कार्यक्रम ठेवला होता. तिथूनच माझ्या घराकडे जाण्याचा रस्ता आहे. तिथेच स्वागत समारंभ ठेवला होता. परंतु, साडेतीन ते पाच वाजेपर्यंत ते रस्त्यावर आलेच नाहीत. त्यांच्या स्वागतासाठी क्रेन आणले होते. ते क्रेन नाक्यावर लावले आणि रस्ता अडवला.

हे ही वाचा >> “संसदेत भाषणाची वेळ आली की अजित पवार बाथरूममध्ये जाऊन…”, जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका

भास्कर जाधव म्हणाले, राणे यांच्या सभेला माणसंच नव्हती. त्यानंतर त्यांचा कार्यक्रम सुरू झाला. फटाके वाजवण्यात आले. मी माझ्या लोकांना घरी जाण्यास सांगितलं. आम्ही हा विषय संपवला होता. मीसुद्धा घरी निघालो. त्याच वेळी त्यांनी तिथे सत्कार केला. त्यावेळी माझ्या बाजूला ५ ते १० हजार माणसं होती. तर त्यांच्याकडे शे-दोनशे माणसं होती. ते लोक नाचत पुढे आले. हातवारे करून आमच्या कार्यकर्त्यांना उचकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी आमच्या लोकांना शांत केलं. त्याचवेळी पलीकडून दगडफेक झाली. मग इकडूनही दगड फेकले. खरंतर पोलिसांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे परिस्थिती हाताळायला हवी होती. तसेच मिरवणूक काढायची काही गरज नव्हती. हा सगळा प्रकार होत असताना आम्ही रस्त्याच्या पलिकडे गेलो नाही. आम्ही आमच्या आवारातच उभे होतो. तिथून घोषणा दिल्या गेल्या, उचकवलं गेलं, हातवारे केले गेले. पहिल्यांदा दगडफेक केली. परंतु, पोलिसांनी केवळ एकतर्फी कारवाई केली. आमच्यावर लाठीचार्ज केला आणि आमच्यार अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp thackeray group clash at guhaghar stone pelting bhaskar jadhav vs nilesh rane asc
Show comments