सातारा : मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात खासदार उदयनराजे भोसले, प्रभारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपची आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये भाजप संघटनपर्व अंतर्गत मंडल व सक्रिय सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील, आ. मनोज घोरपडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, धैर्यशील कदम, मदन भोसले, सुनील काटकर व इतर उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षातर्फे सभासद नोंदणीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. आता लवकरच मंडलाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत. जिल्ह्यात नव्याने जिल्हाध्यक्ष निवडले जाणार आहेत. जिल्हाध्यक्षपदासाठी खासदार उदयनराजे यांचे सहकारी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सुनील काटकर, भाजप पंचायतराज आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष रणजित फाळके, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, किसान आघाडीचे रामकृष्ण वेताळ, साताराचे माजी शहराध्यक्ष विकास गोसावी यांची नावे आघाडीवर आहेत.

सुनील काटकर यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाने दिलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडली. पंचायतराज आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना रणजित फाळके यांनी जिल्ह्यासह राज्यपातळीवर पक्षाची बांधणी उत्तम केली. जयकुमार शिंदे यांनी माढा लोकसभा व फलटण विधानसभा मतदारसंघात भाजपची चांगली बांधणी केली आहे.

रामकृष्ण वेताळ हे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी दावेदार होते. सातारा शहराध्यक्ष म्हणून काम करत असताना विकास गोसावी यांनी भाजपचे मूळ प्रवाहातील कार्यकर्ते आणि नव्याने येणाऱ्या कार्यकर्त्यांची चांगली सांगड घातली होती. लोकसभा, विधानसभा निवडणुकांसोबतच सभासद नोंदणीच्या कार्यातही त्यांनी चांगले योगदान दिलेले आहे. त्यामुळे हे पाचही पदाधिकारी जिल्हाध्यक्षपदासाठी दावेदार ठरले आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर मंत्रिपद वाटपाचा कार्यक्रम पार पडताच भाजपने सदस्य नोंदणीचा कार्यक्रम देशभर हाती घेतला होता.

सातारा जिल्ह्यातून सदस्य नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळाला. पक्षाने जिल्ह्यामधील मंडलांची संख्याही वाढवलेली आहे. ज्या ठिकाणी एक मंडल होते, तिथे आता दोन मंडलांची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकाच शहरात दोन शहराध्यक्ष पहायला मिळतील. शहराध्यक्षांची निवड पार पडल्यानंतर जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जातील. जिल्हाध्यक्ष निवडीमध्ये मंत्री, खासदार, आमदार यांची मतेही जाणून घेतली जाणार आहेत. सध्याचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्याकडे पक्षाच्यावतीने नवीन जबाबदारी दिली जाणार आहे.