आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू असताना काल (११ जून) पोलिसांनी काही वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेवरून आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही या घटनेवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, “पोलिसांच्या अंगात औरंगजेब संचारला होता. देवेंद्र फडणवीसांना प्रश्न पडतो की महाराष्ट्रात औरंग्याची औलाद कशी काय निर्माण झाली. ती काल आम्ही पाहिली तुमच्या राजवटीत. याला जबाबदार पूर्णपणे भारतीय जनता पक्ष आहे. आळंदीच्या वारीचं नियोजन राजकीयदृष्ट्या आपल्या हातात असावं. देवळात कोणी जावं, किती लोकांनी जावं, कसं जावं याचं नियोजन भाजपाचे काही बोगस आचार्य, प्राचार्य, दृढाचार्य तिथे बसून करत होते. यातून वारकरी आणि त्यांच्यात वाद झाला. शेवटी, ती परंपरा संस्कृतीची वारकऱ्यांची आहे. राजकीय टग्यांची नाही. त्यातून पोलिसांना वारकऱ्यांवर लाठीमार करावा लागला. बेदमपणे वारकऱ्यांना मारताना चित्र दिसतंय, त्यामुळे लाठीमार झाला हे कोणी नाकारच शकत नाही”, असं संजय राऊत म्हणाले. त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
“वारकऱ्यांवरचा हल्ला हा महाराष्ट्राच्या संस्कृतीवरचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा हल्ला आहे. पंढीरीची वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता आहे. अख्ख्या जगात वारीचा सन्मान केला जातो. नियोजन, संयम, शांतता शिस्त अशी वारी असते. अशाप्रकारचं संकट कधी आलं नव्हतं. या सरकारची लोकं विठूमाऊलीची महापूजा करायला जातील. त्यांना अधिकार नाही. त्यांनी आधी महाराष्ट्र आणि वारकऱ्यांची माफी मागितली पाहिजे”, असं संजय राऊत म्हणाले.
ही सक्तीची मस्ती आहे
“वारकऱ्यांची संस्कृती ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण ज्या पद्धतीने काल निर्घुण हल्ला झाला, पळापळ झाली, वारकरी जखमी झाले. हे लक्षण कसलं आहे? ही सक्तीची मस्ती आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी भाजपा आपली राजकीय मस्ती दाखवायला जाते. मग त्र्यंबकेश्वर असेल, शेगाव असेल, नगर, संगमेश्वर असेल प्रत्येक ठिकाणी वातावरण तापवायचं. त्यासाठी त्यांनी टोळ्या पाळलेल्या आहेत. त्या टोळ्या तिथे घुसतात आणि धार्मिक तणाव निर्माण करतात. पण, आम्हाला वाटलं वारकरी संप्रदाय तरी यातून वाचेल. पण काल इतिहासातील अत्यंत निर्घूण प्रकार महाराष्ट्रात झाला. आळंदीमध्ये वारकरी बांधवांवर हल्ला झाला. याबद्दल कोण प्रायश्चित्त घेणार. तुमचे ते धर्माभिमानी एकनाथ शिंदे कुठे आहेत? हिंदुत्त्वाचा आक्रोश करणारे देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? हिंदू आक्रोश मोर्चा काढणारे लोकं कुठे आहेत? वारकऱ्यांवरचा हल्ला हिंदुत्त्वावरचा हल्ला नाही का? हिंमत असेल तर सरकारविरोधात हिंदुत्त्वाचा आक्रोश मोर्चा काढा. आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो. सरकारने महाराष्ट्राची आणि वारकऱ्यांची माफी मागावी, अशी आमची मागणी आहे”, असंही ते पुढे म्हणाले.
…अन् मंदिराचा ताबा घेतात
“भाजपाची टोळी त्र्यंबकेश्वरला घुसली होती, तीच आळंदीत होती. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात काही गंध नसताना टोळभैरव घुसतात आणि मंदिरांचा ताबा घेतात. वारकऱ्यांचा ताबा घेतात, अनेक महत्त्वाच्या अध्यात्मिक पिठांचा ताबा घेतात. हा काय प्रकार आहे? याचा परिणाम आहे की वारकऱ्यांवर हल्ला झाला”, असं राऊत म्हणाले.
भाजपाने वारकऱ्यांवरील हल्ल्याचा साधा निषेधही केला नाही. पुण्याचे पालकमंत्री कुठे आहेत? त्यांच्या हद्दीतच झालं ना. कुठे आहे मिंधे गट? एरवी वचावचा बोलत असतो, आता आहेत कुठे? असा सवालही राऊतांनी विचारला.
अन्यथा पंढरीच्या दारात पाय ठेवू नका
“याप्रकरणी ते गुन्हा दाखल करणारच नाही. वारकऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बडतर्फीची मागणी केली आहे. पण तुम्ही कालच्या घटनेप्रकरणी साधी खंत किंवा खेद तरी व्यक्त केला आहे का? ती तर करा. नाहीत तर तुम्हाला पांडुरुंगांची महापूजा करण्याचा अधिकार नाही. तुम्ही वारकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय पंढरीच्या दारात पाय ठेवू नका”, असा इशाराही त्यांनी दिला आहे.