राज्यात एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या निवासस्थानावर केलेल्या आंदोलनाचा मुद्दा चर्चेत असताना दुसरीकडे कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीसाठी वातावरण आता तापू लागलं आहे. कोल्हापुरात भाजपानं आपली ताकद पणाला लावली असताना महाविकास आघाडीकडून देखील पंढरपूर पोटनिवडणुकीचं उट्टं काढण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर दौऱ्यावर आलेले भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरून महाविकास आघाडीवर आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सिल्व्हर ओक’वरील आंदोलनावर सूचक प्रतिक्रिया

शरद पवारांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उदयनराजे भोसले यांनी यावेळी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “या जन्मी आपण जे कर्म करतो, ते याच जन्मी फेडावं लागतं. सगळ्यांना हे लागू होतं. अपवाद कुणाचाही नाही. अजून काय बोलणार त्यावर?” असं उदयनराजे भोसले बोलले आहेत.

“कुठलीतरी शक्ती त्यांच्या पाठिशी होती”, सिल्व्हर ओकवरील आंदोलनाबाबत अजित पवारांनी व्यक्त केला संशय; म्हणाले, “मला एका गोष्टीची…!”

“काँग्रेस-राष्ट्रवादीनं लोकांना सोयीप्रमाणे वापरलं”

उदयनराजे भोसले यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. “हे पंचायत राजची संकल्पना सांगतात. जी गांधीजींनी तेव्हा मांडली होती. जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही, तोपर्यंत लोकशाही देशात नांदणार नाही. काय केलं काँग्रेस-राष्ट्रवादीनं? सत्तेचं केंद्रीकरण केलं. मूठभर लोकांच्या हातात सत्ता राहिली आणि बाकीच्यांना त्यांनी सोयीप्रमाणे वापरलं. याला गुलामगिरी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं?” असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

“असं काय घडलं की पार चिरफाड करून टाकली?”

“याआधी महाराष्ट्रानं अनेक मुख्यमंत्री बघितले. भाजपाकडून देवेंद्र फडणवीसांनी चांगल्या प्रकारे धुरा सांभाळली. त्यावेळी शिवसेना बरोबर होती. मग असं काय घडलं की त्यांनी पार चिरफाड करून टाकली”, असं उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले.

‘सिल्व्हर ओक’वर झालेल्या आंदोलनावरून देवेंद्र फडणवीसांनी मुंबई पोलिसांवर ओढले ताशेरे; म्हणाले…

“….यातूनच अस्थिरता वाढत गेली”

“आज काय अवस्था आहे? कोण भोगतंय? कुणामुळे? आज जे सत्तेत आहेत, त्यांना ज्यांनी निवडून दिलं त्यांचाच विसर पडलाय. कारण ते आपली सत्ता टिकवण्याच्याच मागे आहेत. कोण इकडे जाईल का? कोण तिकडे जाईल का? प्रगतीचा विचार येणारच कसा? मग यातून अस्थिरता वाढत गेली”, अशा शब्दांत उदयनराजे भोसलेंनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

“याचा परिणाम कुणाला भोगायला लागतो? तुमच्या-आमच्या कुटुंबातल्या तरुणांवर परिणाम होतो. त्यांची प्रगती थांबते. बारकाईने आपण विचार करायला हवा… सत्ता कुणाचीही असो. लोकांच्या प्रगतीवर गदा अजिबात येता कामा नये”, असं देखील उदयनराजे भोसले म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp udayanraje bhosle slams ncp sharad pawar shivsena congress pmw