सांगली : जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर वन ठरला असून निवडणुक झालेल्या ८४ पैकी ३६ ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा विजय झाला आहे, तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने १८ ग्रामपंचायतीमध्ये सत्ता हस्तगत करून दुसरे स्थान मिळवले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही शिराळा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीची सत्ता हस्तगत केली आहे.रविवारी झालेल्या मतदानानंतर आज सकाळी मतमोजणी पार पडली. स्थानिक पातळीवरील निवडणुक असल्याने मोठ्या चुरशीने ही निवडणुक लढविली गेली होती. राज्यात बदलत्या राजकीय समिकरणचे गावपातळीवर काय परिणाम आहेत हे पाहण्यासाठी निकालाबाबत मोठी उत्सुकता होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसर्‍या टप्प्यातील  ९४ ग्रामपंचायतीपैकी १० ग्रामपंचायतीच्या निवडणुका अविरोध झाल्याने  ८४ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. आज अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय बलाबल स्पष्ट झाले. ते असे भाजप- ३६, राष्ट्रवादी शरद पवार गट- १८, राष्ट्रवादी अजित पवार गट- २, शिवसेना शिंदे गट- ६, महाराष्ट्र नवनिर्माण सेना – १, काँग्रेस- २. या निवडणुकीत शिवसेना उध्दव ठाकरे गटाला एकाही ग्रामपंचायतीची सत्ता मिळवता आली नाही.

हेही वाचा >>>“मराठा आरक्षणाला विरोध नाही पण…”, छगन भुजबळ यांचं वक्तव्य चर्चेत

कडेगाव तालुक्यातील चिंचणी गावात काँग्रेस तर मायणीमध्ये भाजपची सत्ता आली. सर्वात लक्ष्येवधी ठरलेल्या कुंडल (ता. पलूस) ची सत्ता राष्ट्रवादीने राखली असून आमदार अरूण लाड यांच्या नेतृत्वाखाली सरपंच निवडून आले असून १७ पैकी १४ जागा जिंकल्या आहेत. या ठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक आणि राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांचे मेहुणे महेंद्र लाड यांच्या गटाला केवळ तीन जागा मिळाल्या. आटपाडी तालुक्यातील  १५ ग्रामपंचायतीपैकी ९ ग्रामपंचायतीवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपने सत्ता संपादन केली आहे. यामध्ये करगणी, नेलकरंजी, मानेवाडी, वाक्षेवाडी, कानकात्रेवाडी, चिंचाळे, आंबेवाडी, मिटकी, काळेवाडी या गावांचा समावेश आहे. तर आमदार अनिल बाबर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाने विभुतवाडी, मासाळवाडी, निंबवडे, पिंपरी खुर्द, पुजारवाडी, आवटेवाडी, मुंढेवाडी या गावात तर अमरसिंह देशमुख गटाने बनपुरीची सत्ता हस्तगत केली आहे.

खानापूर तालुक्यात देवनगर, भेंडवडे (गा) या गावात  आमदार बाबर यांच्या पॅनेलची सत्ता आली असून साळशिंगे, भेंडवडे (रा) या दोन गावात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपचे संयुक्त पॅनेल विजयी झाले. जत तालुक्यात पाचही ग्रामपंचायती माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखालील भाजपने जिंकल्या आहेत. यामध्ये कोंत्येव बोबलाद, बिळूर, खिलारवाडी, गुळगुंजनाळ, कानबाजी या गावांचा समावेश आहे.

मिरज तालुक्यातील हरिपूर येथे भाजप पुरस्कृत पॅनेलचा विजय झाला असून सरपंच पदी राजश्री तांबवेकर या विजयी झाल्या आहेत. तर नांद्रे येथे समिश्र चित्र दिसून आले असून निवडणुक निकालानंतर मतमोजणीच्या ठिकाणी परस्पर विरोधी गटात घोषणाबाजीने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलीसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा तणाव निवळला.