लोकसत्ता प्रतिनिधी

सातारा : साताऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप पक्ष स्वबळावर लढवेल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली.

येथील पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष कदम बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद कृषी समितीचे माजी सभापती भीमराव पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सुनील शिंदे, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा तालुकाध्यक्ष महेश गाडे, कराड दक्षिण अध्यक्ष धनंजय पाटील, कोरेगाव अध्यक्ष संतोष जाधव, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी आदी उपस्थित होते.

कदम म्हणाले, देशात भाजपची सत्ता सलग तिसऱ्यांदा आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गरिबांसाठी काम करणारे आहे. महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असून त्यांनी १०० दिवसांचा रोडमॅपच दिला आहे. त्यातूनच आता गरिबांचं घरकुलाचं स्वप्न साकार होत आहे. सातारा जिल्ह्याला ४५ हजारांहून अधिक घरकुले मंजूर आहेत. एका घरकुलासाठी १ लाख ५८ हजार ७३० रुपये मिळतील. या घरकुल कार्यारंभ कार्यक्रम शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होत आहे. सातारा जिल्हा परिषदेतही पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना घरकुल काम सुरू करण्याबाबत आदेश देण्यात येईल. जिल्ह्यातील घरकुले एक वर्षात बांधून पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

सातारा जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला झाला आहे. सध्या जिल्ह्यात भाजपची सदस्य नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत ३ लाख २० हजार सदस्यांची नोंदणी पूर्ण झाली. तसेच १० हजार सक्रिय सदस्य करायचे आहेत. जिल्ह्यात भाजपची ताकद वाढत आहे, अशी माहितीही यावेळी धैर्यशील कदम यांनी दिली.

पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांनी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत भाष्य केल्याचा प्रश्न केला. यावर कदम यांनी भाजपही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवले, असे ठामपणे सांगितले. तरीही याबाबत भाजप वरिष्ठांचा निर्णय होईल तो अंतिम असेल, असे स्पष्ट केले.

Story img Loader