शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटानं आता पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी ठाकरे गटातील नेते महाराष्ट्र दौऱ्यावर जात आहेत. याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते भास्कर जाधवही आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. तत्पूर्वी ते आज गुहागर येथे शिवसेना कार्यकर्त्यांना भेटले आहेत. यावेळी ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी काही गंभीर विधानं केली आहेत. येत्या काळात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात दंगली घडवू शकते, असं त्यांनी म्हटलं आहे.
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना भास्कर जाधव म्हणाले की, “तुम्ही संपूर्ण देशाची राजकीय परिस्थिती बघितली तर लक्षात येईल, ज्या-ज्या राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, त्या-त्या राज्यात निवडणुकीपूर्वी जातीय दंगली झालेल्या आहेत. जातीय दंगली घडल्या आहेत किंवा जातीय दंगली घडवल्या आहेत. हा इतिहास आहे.”
हेही वाचा- “…नाहीतर अजित पवारांनी शिवसेना खाऊन टाकली असती” रामदास कदमांचा जोरदार हल्लाबोल!
“शिवसेना संपवण्याचे सर्व मार्ग संपले आहेत. शेवटचा मार्ग म्हणून राज्यात कदाचित जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, तसा प्रयत्न पूर्वी अडीच वर्षांमध्ये झाला आहे. कारण त्यांना मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे. मुंबई महानगरपालिका जिंकायची असेल, तर राज्यात जातीय दंगली घडवण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही, हे त्यांना कळून चुकलं आहे.”
हेही वाचा- “रस्त्यावरील शेंबडं पोरगंही…” शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल!
“उद्धव ठाकरेंचं अतिशय सौम्य आणि सभ्य नेतृत्व राज्यातील सगळ्या जाती-धर्मातील लोकांना भावलेलं आहे. मुस्लीम समाजालाही उद्धव ठाकरेंचं नेतृत्व भावलं आहे. हेच खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं दु:ख आहे. आम्ही एवढा मोठा शिवसेना पक्ष फोडला पण बाजुला फक्त ४० आमदार आले. याच्या बदल्यात प्रत्येक ठिकाणी चार लाख लोकं शिवसेनेच्या बाजुवे गेली, हे चित्र आज महाराष्ट्र अनुभवतोय, त्यामुळे भारतीय जनता पार्टी असा काहीतरी उद्योग करू शकते” असं गंभीर विधान भास्कर जाधवांनी केलं आहे.