महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सोमवारी (११ डिसेंबर) भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार यांना मुख्यमंत्री करा. मी पाठिंबा देतो आणि सभागृहात ठराव मांडतो. मला तुमचा दम बघायचा आहे. माझ्या पक्षाची हमी मी घेतो, असं आव्हान भास्कर जाधव यांनी भाजपाला दिलं. ज्याच्याबरोबर मैत्री कराल, त्याचं वाटोळं केल्याशिवाय राहत नाही, अशी टीकाही भास्कर जाधवांनी भाजपावर केली. यावर आता ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय जनता पार्टी अजित पवारांना कधीही मुख्यमंत्री करणार नाही. त्यांनी अजित पवारांचा वापर केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यासाठी केला. त्यामुळे भास्कर जाधव यांनी विधानसभेत उपरोधिक विधान केलं, अशी प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी वैभव नाईक म्हणाले, ” भारतीय जनता पार्टी प्रत्येकाचा वापर करून घेते. भाजपाने गेली २५ वर्षे शिवसेनेचा वापर केला. उद्धव ठाकरे यांनी पुढे शिवसेनेचा वापर करू दिला नाही, म्हणून आमची युती तुटली. तसेच भाजपा अनेकवेळा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करण्यास इच्छुक होती. अनेकदा बोलणीही झाली.”

हेही वाचा- “अजित पवारांना मुख्यमंत्री करा, मी पाठिंबा देतो अन्…”, भास्कर जाधवांचं भाजपाला आव्हान

“भाजपाने अजित पवार यांचा वापर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यासाठी केला आहे. त्यामुळे अजित पवारांना भाजपा कधीही मुख्यमंत्री करणार नाही. कारण लोकांमध्ये असलेला नेता भाजपाला आवडत नाही आणि परवडत नाही, हे अनेकदा आपण बघितलं आहे. त्यांना फक्त त्यांच्या ताटाखालचे मांजर पाहिजे असतात. त्यामुळे ते अजित पवारांना कदापि मुख्यमंत्री करणार नाहीत. त्यामुळे भास्कर जाधव यांनी उपरोधिकपणे विधान केलं आहे,”असंही वैभव नाईक म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp will never make ajit pawar chief minister statement by thackeray faction leader vaibhav naik rmm