२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसह विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ‘इंडिया’ आणि ‘एनडीए’ आघाडीकडून विविध ठिकाणी बैठका घेतल्या जात आहे. संबंधित बैठकीतून लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती आखली जात आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक मुंबईत होणार आहे. यापूर्वी बिहारमधील पाटणा आणि कर्नाटकमधील बंगळुरू येथे विरोधी पक्षाच्या दोन बैठका पार पडल्या आहेत.
या दोन्ही बैठकांमध्ये विरोधी पक्षाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. बंगळुरू येथील बैठकीतून विरोधी पक्षाच्या आघाडीचं नामकरण ‘इंडिया’ असं करण्यात आलं. यानंतर एनडीएकडूनही बैठका घेण्यात आल्या. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला १५० च्या वर जागा जिंकता येणार नाहीत. २०२४ मध्ये महाराष्ट्रासह देशात सत्तापरिवर्तन होईल, असं विधान संजय राऊत यांनी केलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा- मोठी अपडेट: नवाब मलिक कोणत्या गटात जाणार? स्वत:च दिलं उत्तर, म्हणाले…
यावेळी संजय राऊत म्हणाले, “महाविकास आघाडी महाराष्ट्रात लोकसभेच्या ४० हून अधिक जागा जिंकणार आहे, अशी आमची खात्री आहे. लोकभावनाही तशीच आहे. याशिवाय बिहारमध्ये ३० हून अधिक, महाराष्ट्रात ४० हून अधिक, पश्चिम बंगालमध्ये ३० हून अधिक आणि कर्नाटकमध्ये २५ हून अधिक जागा ‘इंडिया’ जिंकेल. हे आमचे पक्के आकडे आहेत. भारतीय जनता पार्टी देशात १५० जागांच्या पुढे अजिबात जाणार नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सत्तापरिवर्तन होईल. सध्या अन्याय, जुलूम करणारं बेकायदेशीर राज्य सुरू आहे. ते राज्य २०२४ ला जनता उलथून टाकेल.”