अपप्रचार करण्यात आरएसएस आणि जनसंघाचा हातखंडा आहे. नरेंद्र मोदींचा प्रचारही ते अशाच पद्धतीने करीत असल्याने त्यांच्या खोटय़ा प्रचाराला बळी पडू नका. त्यांच्या अपप्रचाराला बळी पडलात तर ही देशाची शेवटची निवडणूक असेल. ही सर्व मंडळी हुकूमशाह आहेत. ते देशात हुकूमशाही आणतील, असा आरोप पालकमंत्री मधुकर पिचड यांनी केला. काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या राहाता तालुक्यातील प्रचाराची सुरुवात पिचड यांच्या हस्ते व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, रावसाहेब म्हस्के, अॅड. नारायण कार्ले, नगराध्यक्ष कैलास सदाफळ, सुमित्रा कोते आदी उपस्थित होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना आरएसएस आणि जनसंघाने गणपती दूध पिल्याची अफवा संपूर्ण राज्यात केली असल्याची आठवण करून देत पिचड म्हणाले, की देशाचा पंतप्रधान ठरवून एक पक्ष मोकळा झाला. यामागे आरएसएस आणि जनसंघाची शक्ती आहे. पंतप्रधानपद होऊन चालून आले असताना सोनिया गांधी यांनी ते मनमोहन सिंग यांना बहाल केले. या देशात येऊ पाहणाऱ्या हुकूमशाहीला तिलांजली द्यायची असेल तर पुन्हा यूपीएचे सरकार सत्तेवर आणले पाहिजे. बरे झाले वाकचौरे यांच्या हातातील शिवबंधनाचा गंडा तुटला. तो कच्चाच होता. ‘जय भवानी जय शिवाजी’ हा एकमेव कार्यक्रम समोरच्यांचा आहे. आपल्याला रयतेचे राज्य आणायचे आहे. शेटजी, भटजींचे नाही. महसूलमंत्री थोरात म्हणाले, की कोणालाही धक्का न लागू देता वाकचौरे यांनी गेल्या पाच वर्षांचा प्रवास सुखाचा केला. त्यांच्यावर जनता खूश आहे. विरोधी उमेदवार ताबडतोब गेला, पुढचा येण्याचे धाडस करणार नाही. कृषिमंत्री विखे म्हणाले, की एका बाजूला धर्माधशक्ती देशाला अस्थिर करू पाहात आहे. तर दुसऱ्या बाजूला देशाचे सार्वभौमत्व अबाधित ठेवून देशाला विकासाभिमुख बनविण्याचे काम करणारी मंडळी असल्याने जनतेने काँग्रेस आघाडीचे उमेदवार वाकचौरे यांना विजयी करावे.
भाजप देशात हुकूमशाही आणेल- पिचड
अपप्रचार करण्यात आरएसएस आणि जनसंघाचा हातखंडा आहे. नरेंद्र मोदींचा प्रचारही ते अशाच पद्धतीने करीत असल्याने त्यांच्या खोटय़ा प्रचाराला बळी पडू नका. त्यांच्या अपप्रचाराला बळी पडलात तर ही देशाची शेवटची निवडणूक असेल. ही सर्व मंडळी हुकूमशाह आहेत. ते देशात हुकूमशाही आणतील, असा आरोप पालकमंत्री मधुकर पिचड यांनी केला.
First published on: 24-03-2014 at 03:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp will totalitarian in country pichad