वाई: सातारा हा कधीतरी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता आता नाही. या पुढील निवडणुकीत साताऱ्यातील सर्व आमदार आणि खासदार भाजपचे असतील. भाजप गठबंधन राज्यातील सर्व जागा जिंकेल साताऱ्यात भाजपाला फारच चांगले अनुकूल वातावरण असल्याचे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी व्यक्त केले.
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा सातारा लोकसभा मतदार संघाच्या दोन दिवसांच्या जनसंपर्क दौऱ्यावर होते.आज साताऱ्यात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आणखी वाचा- सातारा: “उदयनराजेंना भाजपात लवकरच मोठी जबाबदारी देणार”, केंद्रीय मंत्र्यांचं आश्वासन
साताऱ्यात आणि राज्यात भाजपाला अनुकूल वातावरण आहे त्यामुळे बारामतीसह राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा आम्ही जिंकू असे सांगून मिश्रा म्हणाले साताऱ्यातील विधानसभेच्या सर्व जागाही भाजपच्या असतील.सातारा हा कधीतरी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता पण आता नाही.त्यांच्यात आज खूप भांडणे सुरु आहेत.कोण राजीनामा देते कोण तरी मागे घेते, हे सगळे ठरवून नाटक चालल्या सारखे सुरु आहे.यामुळे हे पक्ष त्यांच्या अंतर्गत राजकारणातच अडकणार आहेत.इतर राजकीय पक्षांपेक्षा भाजपामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि दोषी असणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे.देशात कोठेही गुन्हेगारीला प्रोत्साहन दिले जात नाही.प्रत्येक ठिकाणी कायदा आपले काम करत आहे. यावेळी त्यांनी शासकीय योजनांचा आढावा घेतला.शासकीय योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे, अशा सूचना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केल्या.
जिल्ह्यात सर्व विभाग त्यांच्या योजना चांगल्याप्रकारे राबवित असल्याचे सांगून श्री. मिश्रा पुढे म्हणाले, आणखी चांगले काम करावे, यासाठी सर्व विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योगदान द्यावे. योजनांच्या माध्यमातून जनतेचा विकास करणे हे शासनाचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्याने काम करावे. यावेळी श्री. मिश्रा यांनी प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, ग्रामसडक योजना, आरोग्य विभागाशी व महिला बालकल्याण विभागाशी संबंधित विविध योजना यांचा सविस्तर आढावा घेतला.