भाजपाच्या विरोधात २० पक्ष एकत्र आले तरीही काही फरक पडणार नाही. कौरवांच्या विरोधात पांडव लढलेच होते ना? पांडवांचं सैन्य जिंकलं कारण त्यांची बाजू सत्याची होती. आमची बाजूही सत्याची आहे. आमच्या विरोधात ३ काय २० पक्ष आले तरीही काही फरक पडत नाही असं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांनी हे मत व्यक्त केलं आहे.

काय म्हणाले आहेत सुधीर मुनगंटीवार?

आम्ही निवडणुकांसाठी राजकारण करत नाही. आम्ही जनहितासाठी काम करतो. २०१९ ला आमचा आमच्याच मित्राने विश्वासघात केला. निकाल लागल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं गेलं की आम्हाला अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद पाहिजे आहे. प्रचाराच्या वेळी पंतप्रधान महोदयांनीही हे सांगितलं होतं की पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील. पण यांच्या मनात ही भावना निर्माण झाल्याने महाराष्ट्राचं नुकसान झालं.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून माझा उद्धव ठाकरेंसोबत संवाद नाही

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून माझा उद्धव ठाकरेंशी संवाद झालेला नाही. मी ऑक्टोबर २०२० मध्ये मी त्यांना समजावून सांगितलं होतं. विद्वेषाचं राजकारण जन्माला घातलं जातं आहे हे मी त्यांच्याशी बोललो होतो. पण मला हे लक्षात आलं की उद्धव ठाकरेंमध्ये काही बदल होईल असं वातावरण झालं नाही. उद्धव ठाकरेंचा ब्रेन कुणीतरी हॅक केला होता. हॅकर महाराष्ट्रातलेच आहेत असाही टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लिहिला. कॉम्प्युटर हॅक झाल्यावर उपाय असतोच. एकनाथ शिंदे हा उपाय आहे, आम्ही ती व्यवस्था केली.

२०२४ ला २० पक्ष समोर असले तरीही काही फरक पडत नाही

२०२४ ला आमच्या समोर तीन पक्ष काय? ३० पक्ष असूद्यात ना. आमची बाजू सत्याची आहे. महाभारतातही पांडवांच्या सैन्यापेक्षा कौरवांचं सैन्य दुप्पट होतं. मात्र पांडव जिंकले कारण त्यांची बाजू सत्याची होती. वानरांची सेना होती तरीही प्रभू रामचंद्र का जिंकले कारण त्यांची बाजू सत्याची होती. अनेकदा राज्यात दोन पक्षांची सत्ता होतीच. आज हे जेव्हा लोकांना सामोरे जातील तेव्हा काय तोंड घेऊन जातील? असाही प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला आहे.

अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने काय केलं?

अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार होतं. त्यांना एक तरी अशी गोष्ट सांगता येईल का? ज्यामध्ये शेवटच्या माणसापर्यंत आनंद फुलवला असं एक तरी काम केलं आहे का? महाराष्ट्रात २०१४ च्या आधी ११.४ किमीची मेट्रो होती. आज २३५ किमीची मेट्रो होतो आहे. २० वर्षांचा मुलगा चौथीत शिकतो तेव्हा तो खूप शिकतोय असं म्हणता येणार नाही असं म्हणत सुधीरभाऊंनी काँग्रेस राष्ट्रवादीलाही टोला लगावला.