चार राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल बघता देशभरात काँग्रेसच्या विरोधात वातावरण असून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला २७२ पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचा फारसा प्रभाव पडणार नाही. ‘आगे आगे देखो  होता है क्या’ असे सांगत त्यांनी आम आदमी पक्षावर टीका केली.  
‘अ‍ॅग्रोव्हीजन’ कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने राजनाथ सिंह नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. गेल्या पाच वर्षांत महागाई, भ्रष्टाचारामुळे काँग्रेसने जनतेचा विश्वास गमावला त्यामुळे देशभरात काँग्रेसच्या विरोधात वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केले आहे, मात्र काँग्रेसजवळ आज विश्वास ठेवावा, असे नेतृत्व नाही. त्यामुळे काँग्रेसने पंतप्रधानपदाचा उमेदवार अजूनपर्यंत घोषित केला नाही. लोकसभा निवडणुकीत भाजप समर्थित लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत येईल. जे राजकीय पक्ष आघाडीमध्ये प्रवेश करतील त्यांचे स्वागत केले जाईल. आम आदमी पक्षाला दिल्लीमध्ये जनमत मिळाले असले तरी फार काळ त्यांचा प्रभाव राहणार नाही. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री म्हणून दोन दिवसांनी शपथ घेत आहेत. त्यांना शपथ घेऊ द्या आणि नंतर पुढे काय होते ते बघा. एखाद्या राज्याचा कारभार चालविणे म्हणजे लहान मुलांचा खेळ नाही अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली. मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीतील नागरिकांच्या समस्या सोडवायच्या आहेत, असे केजरीवाल यांनी सांगितले असले तरी ते त्यांच्याकडून कितपत शक्य आहे, याबाबत शंका आहे.
उत्तरप्रदेशमधील मुझफ्फरनगरमधील पीडितांसाठी सुरू केलेल्या छावणीमध्ये सरकारकडून कुठलीच मदत मिळत नाही. उत्तरप्रदेश सरकारने या प्रश्नांकडे वेळीच लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती. काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी मुझफ्फरनगरमधील शिबिरांमध्ये केलेला दौरा म्हणजे देखावा होता. उत्तरप्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे काम वाढत असून लोकसभा निवडणुकीत त्या ठिकाणी चांगले यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित असल्यामुळे त्या विषयावर बोलणे उचित नाही. निकाल आल्यावर या विषयावर भाष्य करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने  देशभर नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा आयोजित केल्या जात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दक्षिणात्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढतो आहे. वेगळ्या विदर्भाबाबत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, छोटय़ा राज्याच्या निर्मितीसाठी भारतीय जनता पक्षाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. विदर्भाच्या संदर्भात भाजपची भूमिका सकारात्मक आहे.
अ‍ॅग्रोव्हीजन कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांचे सकाळी ११ वाजता नागपूर विमानतळावर आगमन होताच कार्यकत्यांतर्फे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. वर्धा मार्गावरील हॉटेल प्राईडमध्ये काही वेळ आराम केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मा.गो. वैद्य यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्यानंतर ते नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आले. त्या ठिकाणी काही वेळ आराम केल्यानंतर रेशीमबागमध्ये स्मृती मंदिरात जाऊन डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर अ‍ॅग्रोव्हीजनच्या कार्यक्रमात सहभागी झाले.

Story img Loader