अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला महापौरपद मिळवता आले नाही. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस, बसप आणि अन्य अपक्षाच्या मदतीने शिवसेनेला धोबीपछाड दिला. भाजपाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. ३७ विरुद्ध शून्य मतांनी त्यांनी विजय मिळवला.
नुकत्याच झालेल्या अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक २४ जागा जिंकल्या आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस १८, भाजपा १४, बसप ४ आणि अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेनेच्या २४ पैकी २३ नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. आपला उमेदवार निवडून येणार नाही हे लक्षात आल्यावर शिवसेनेने मतदानावर बहिष्कार घालण्याची खेळी खेळली.
शिवसेनेकडून बाळासाहेब बोराटे रिंगणात होते. राष्ट्रवादीकडून संपत बारस्कर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण नंतर त्यांनी तो मागे घेतला. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजपा अशी थेट लढाई होती. राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांच्यासोबत सभागृहात दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला साथ देणार हे स्पष्ट झाले होते.
सध्या देशपातळीवर भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधक एकत्र येत आहेत. अहमदनगरमध्येही भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी सेनेला साथ देईल असा अंदाज होता. पण ही शक्यता फोल ठरली. महापौरपदाच्या या निवडणुकीत राज्य सरकारमधील मंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू गिरीश महाजन यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी पडद्यामागून सूत्र हलवली. या विजयामुळे उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या महापालिकांमध्ये भाजपाचे महापौर विराजमान झाले आहेत.