धाराशिव: ड्रग्ज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे आता तुळजापुरातील स्थानिक राजकीय मंडळींपर्यंत पोहोचली आहेत. पोलिसांनी तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील रहिवाशी व तुळजापूर पंचायत समितीच्या माजी सभापतीचे चिरंजीव विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला अटक केली आहे. ड्रग्जची तस्करी करण्यात विश्वनाथ मुळे याची महत्वाची भूमिका असल्याचा पोलिसांचा दावा आहे. आजवर ड्रग्जविक्री प्रकरणात सातजण ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे मुंबई, सिंडिकेटपर्यंत असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी यापूर्वी नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड, तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोक आरगडे, मुंबई येथून संतोष खोत व संगीता गोळे यांना ताब्यात घेतल्यानंतर युवराज देवीदास दळवी आणि आता सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला पोलिसांनी ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणात अटक केली आहे.

दरम्यान ड्रग्ज तस्करी प्रकरणात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेत, कोणाचीही गय न करता या प्रकरणाचा छडा लावण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले होते. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत आजवर सहा जणांना ताब्यात घेतले आहेत. विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला अटक केल्यानंतर पोलिसांनी धाराशिव येथील सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मुळे हा गेल्या काही वर्षांपासून मुंबई येथून ड्रग्ज आणून तुळजापूर येथे विकत होता. तसेच तो मुंबई व तुळजापूर येथील ड्रग्ज पेडलर आणि ड्रग्ज सेवन करणार्‍या लोकांच्या संपर्कात होता. मुंळे व त्याची आई भाजपशी संबंधित असून त्या पंचायत समितीच्या माजी सभापती होत्या. यापूर्वी मुळे हा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होता त्यानंतर त्याने भाजपात प्रवेश केला. जिल्हा सरकारी वकिल महेंद्र देशमुख यांनी सरकारच्या वेतीने बाजू मांडली. त्यांचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने त्यास १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश केला आहे. तपास अधिकारी गोकुळ ठाकूर हे स्वतः न्यायालयात हजर होते. पोलीस अधीक्षक संजय जाधव व उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश देशमुख हे ड्रग्ज प्रकरणावर लक्ष ठेवून असून आणखी तपासात आणखी कोण कोण अडकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.