रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदार संघ हा पारंपारिक भाजपाचा मतदार संघ असताना जिल्ह्यात भाजपाला एकही जागा लढविता येणार नसल्याने जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यात भाजपाने वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत माजी आमदार बाळ माने यांनी आज झालेल्या भाजपाच्या बैठकीत नाराजी व्यक्त करुन आपण वेगळा निर्णय घेत असल्याचे जाहीर केले. यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बाळ माने यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी मतदार संघात भाजपा आणि शिवसेना ( शिंदे गट) यांच्यातील धुसफुस वाढतच असून भाजपाने विद्यमान आमदार व पालकमंत्री उदय सामंत यांचे काम न करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला आहे. याविषयी बोलताना भाजपाचे माजी आमदार बाळ माने म्हणाले की, ज्याने भाजप संपवण्यासाठी वीस वर्षे प्रयत्न केले आणि हिंदुत्वाची कुचेष्टा केली अशा व्यक्तीला निवडून द्यायचे नाही, असे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीत ठरवले. सर्व गोष्टी जाहीर होणार नाहीत, परंतु रत्नागिरीकरांना परिवर्तन हवे आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहिलेला नसून परिवर्तनाच्या लाटेत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ सामील होईल, असे पदाधिकाऱ्यांनी ठरवले. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा एकही जागा लढवणार नाही, अशी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी महत्त्वाची बैठक भाजपा जिल्हा संपर्क कार्यालयात घेण्यात आली.
हेही वाचा >>> Maharashtra Elections 2024 : नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या वाढली
याप्रसंगी बाळ माने भावनिक झाले आणि म्हणाले की, मी ३५ वर्षे भाजपाचा निष्ठावंत म्हणून काम करतोय. हिंदुत्वासाठी, पक्षासाठी सर्व ते योगदान दिले आहे. रत्नागिरीकरांना परिवर्तन हवे आहे. परिवर्तन अटळ आहे, ही काळाची गरज आहे. भाजपा संपवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले परंतु आजही भाजपाची ताकद कमी झाली नाही तर ती वाढतच आहे. खासदार नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण यांचे पाठबळ भाजपाला मिळते आहे. लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी मतदारसंघात परिवर्तन झाले, याचे श्रेय आपल्या कार्यकर्त्यांनाच द्यावे लागेल. आता विधानसभेसाठीही परिवर्तन होणे आवश्यक आहे.
हेही वाचा >>> मुंडे बहीण – भाऊ आणि जरांगेंचा दसरा मेळावा ठरवणार मराठवाड्यातील प्रचाराची दिशा
या बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी आमदार बाळ माने यांच्यासमवेत मंडल अध्यक्ष दादा दळी, विवेक सुर्वे, वर्षा ढेकणे, प्रशांत डिंगणकर, सतेज नलावडे, शहराध्यक्ष राजन फाळके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी सतेज नलावडे यांनी सांगितले की, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाचे मतदान महत्वाचे ठरणार आहे. रत्नागिरीत हिंदुत्वाची कुचेष्टा करणाऱ्यांना मतदान करायचे नाही, अशीच सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे. अशा व्यक्तीला रत्नागिरीकर स्वीकारणार नाहीत. त्यामुळे विधानसभेतील अनुभवी व्यक्तीला निवडून देण्यासाठी कार्यकर्ते तयार आहेत.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सांगितले की, सोयीस्कररित्या आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेणाऱ्या नेत्यांना निवडून द्यायचे नाही, असे कार्यकर्त्यांच्या मनात आहे. सर्वच गोष्टी सांगितल्या जाणार नाहीत. घोडेमैदान दूर नाही. कोकणचे नेते, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण हे आपल्याला योग्य ते आदेश देतीलच. आपण आपल्या बूथ कमिट्या सज्ज करू या. कार्यकर्त्यांच्या भावना मी जाणून घेतल्या आहेत. त्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत असे ही सावंत यांनी सांगितले. जिल्ह्यात भाजपाने घेतलेल्या या भूमिकेमुळे पालकमंत्री उदय सामंत यांची कोंडी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र भाजपाचे वरिष्ट नेते याबाबत काय निर्णय घेतात याकडे रत्नागिरीतील सर्व मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.