लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांंगली : सांगली लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरलेले भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्या संपत्तीमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये तब्बल २९ कोटींची भर पडली आहे, तर अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेेले विशाल पाटील यांच्या संपत्तीमध्ये याच कालावधीत ८ कोटी ८० लाख रूपयांची भर पडली आहे.

भाजपचे विद्यमान खासदार पाटील हे लोकसभेसाठी तिसर्‍यांदा मैदानात उतरले असून त्यांनी उमेदवारी अर्ज भरत असताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण स्थावर व जंगम मालमत्ता ४५ कोटी ८२ लाख ९३ हजार रूपये इतकी आहे. त्यांनी २०१९ मध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यावेळी त्यांची मालमत्ता १९ कोटी ११ लाख ९२ हजार इतकी नमूद करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षामध्ये शेती व व्यवसायामधून मिळालेल्या उत्पन्नामुळे त्यांची स्थावर मालमत्ता ४८ कोटींची ३१ लाख झाली. तर पत्नीची मालमत्ता खासदार पाटील यांच्यापेक्षा ३० कोटी ५० लाख रूपयांनी अधिक असून पत्नीकडून एसजीझेड अ‍ॅण्ड एसजीए शुगर कंपनीसाठी ३२ कोटी ३१ लाख रूपये कर्ज दिले आहे. या कंपनीने तासगावचा तुरची साखर कारखाना खरेदी केला आहे.

आणखी वाचा-शरद पवारांचा अजित पवारांना टोला; म्हणाले, “तुतारीसमोरचं बटण दाबा, कसं दाबायचं ते काल कुणीतरी…”

दरम्यान, या निवडणुकीमध्ये काँग्रेस व अपक्ष उमेदवारी दाखल केलेले विशाल पाटील यांची एकूण संपत्ती ३० कोटी ५२ लाख रूपयांची आहे. पाच वर्षापुर्वी दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातील मालमत्तेपेक्षा यावेळच्या मालमत्तेमध्ये ८ कोटी ८० लाख रूपयांची वृध्दी दर्शवण्यात आली आहे.विशाल पाटील यांच्या नावे २६ कोटी ७४ लाख ९३ हजार तर पत्नी पूजा पाटील यांच्या नावे ३ कोटी ७७ लाख ४८ हजार रूपयांची मालमत्ता आहे. यामध्ये जंगम व स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. तर विशाल पाटील यांच्या नावे ७ कोटी ६५ लाख २ हजार ५६० रूपयांचे आणि पत्नी पूजा पाटील यांच्या नावे ६१ लाख ७६ हजार ९८९ रूपयांचे कर्ज आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjps current mp sanjay patils wealth has increased by 29 crores in last five years mrj