केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसने कन्याकुमारी येथून बुधवार ( ७ सप्टेंबर ) या पदयात्रेचा आरंभ झाला. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या वेळी राहुल गांधी यांच्या हाती तिरंगा ध्वज सोपावला. यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी ३५७० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. मात्र, आता यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी परिधान केलेल्या टी-शर्टवरून त्यांच्यावर भाजपाकडून टीका करण्यात येत आहे. या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“भाजपचे भय संपत नाही.! राहुल गांधींबद्दल टीशर्टची किंमत वगैरे असे टुकार मुद्दे भाजपाला काढावे लागणे यातूनच सिद्ध होतंय की ‘भारत जोडो यात्रे’मुळे भाजपाला धडकी भरली आहे. राहुल गांधींबद्दल भाजपाचे भय संपत नाही आणि आठवण करूनच द्यायची झाली तर आपल्या देशाला एक असे फकीर लाभले आहेत जे १० लाख रुपयांचा सुट परिधान करतात.” असं नाना पटोलेंनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

“मोदींचा १० लाख रुपयांचा सूट…” –

याशिवाय भाजपाने राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या ट्विटला काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुटबद्दल चर्चा करायची का? असं आव्हान देखील दिलं आहे. काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “भारत जोडो यात्रेला नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्याचे पाहून घाबरला काय. बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्यावर चर्चा करा. बाकी कपड्यांवर चर्चा करायची झाली, तर मोदींचा १० लाख रुपयांचा सुट आणि १.५ लाख रुपयांच्या चष्म्यापर्यंत गोष्ट जाईल,” असं सडेतोड उत्तर काँग्रेसने दिलं आहे.

राहुल गांधी नेहमी कुर्ता आणि पायजम्यामध्ये सर्वांना दिसतात. पण, भारत जोडो यात्रेच्या प्रवासावेळी त्यांनी टी-शर्ट आणि पँट घातली आहे. त्यांनी घातलेल्या टी-शर्टच्या किंमतीवरून भाजपाने राहुल गांधींवर टीका केली आहे. भाजपाने याबाबत ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी ब्रिटिश लग्जरी कंपनीच्या ब्रँडचा बर्बेरी हा पांढरा टी-शर्ट घातला आहे. त्याची किंमत ४१ हजार २५७ रुपये असल्याचं सांगितलं आहे. तसेच, ‘भारत देखो’ असे कॅप्शनही त्यावर लिहलं आहे. या ट्विटमुळे राहुल गांधी यांच्या परिधान केलेल्या कपड्यांच्या किंमतींची चर्चा होत आहेत.

Story img Loader