ठाकरे गटाचे सर्वोसर्वा उद्धव ठाकरे यांनी काल (२९ जुलै) ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये हिंदी भाषिक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी भाजपासह शिंदे गटावर प्रखर टीका केली. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही आगपाखड केली. त्यांच्या भाषणावरून आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे.
“बऱ्याच दिवसानंतर उबाठाचे नेते उद्धव ठाकरे काल घराबाहेर पडले आणि मजल दर मजल करत त्यांनी ठाणे गाठले. आणि कधी नव्हे ते त्यांना उत्तर भारतीय मतदारांची आठवण झाली. आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली”, असं बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा >> “…तसा अजून कुणी पैदा झाला नाही”, उद्धव ठाकरेंचं शिंदे गटावर टीकास्र
“देशासाठी मोदीजी काय करतात याचे प्रमाणपत्र उद्धव ठाकरे यांनी देण्याची गरज नाही. मोदीजींमुळे देशाची मान उंचावली आहे. पण उद्धवजी तुमच्या हिंदुत्वविरोधी भूमिकेमुळे प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिकाची मान शरमेनं खाली झुकली आहे. मोदीजींना हुकूमशाह म्हणणारे तुम्ही सोनिया गांधींपुढे मात्र लोटांगण घालत आहात. माझे कुटुंब माझी जबाबदारी हे फक्त तुमच्या भाषणात आहे, प्रत्यक्ष कृतीमध्ये मात्र आदित्य ठाकरेंना मंत्री करताना तुम्हाला सच्चा शिवसैनिक दिसला नाही. त्या प्रामाणिक शिवसैनिकाला दूर ठेवले म्हणूनच कधीकाळी हजारोंच्या उपस्थितीत सभा घेणाऱ्या उद्धव ठाकरेंना नाट्यगृहात एकपात्री प्रयोग करावा लागला. तुमचे असेच नाट्य सुरू राहिले तर २०२४ नंतर तुमच्यावर चारचौघात भाषण करण्याची वेळ येईल”, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होत?
तुम्ही म्हणता मी काँग्रेसबरोबर गेलो होतो. होय, मी काँग्रेसबरोबर गेलो होतो पण खुलेआम (दिवसाढवळ्या) गेलो होतो. मी तुमच्यासारखं अर्ध्या रात्री लपून-छपून बैठका नव्हत्या घेतल्या. पण मी भाजपाला एक प्रश्न विचारू इच्छितो की, आम्हाला काँग्रेसबरोबर जाण्यास मजबूर कुणी केलं? भाजपाबरोबर आम्ही २५ वर्षे होतो. ही जगातील एकमेव युती असेल, जी इतकी वर्षे हिंदुत्वासाठी मजबूतीने एकत्र राहिली. ही युती सगळ्यात आधी कुणी तोडली असेल तर ती भाजपानेच तोडली. आता आपल्यातील काही लोक गळ्यात पट्टा बांधून तिकडे गेले आहेत. तसा पट्टा माझ्या गळ्यात बांधणारा अजून कुणी पैदा (जन्मला) झाला नाही आणि तो होणारही नाही. कारण माझ्या नसांमध्ये बाळासाहेब ठाकरेंचं रक्त वाहत आहे. मी कधीही लाचार किंवा गुलाम बनणार नाही. मी तुमच्यासारख्या माझ्या हिंदू लोकांसमोर नक्की झुकेल. पण मी हुकूमशाहीपुढे कधीही झुकणार नाही. मी हुकूमशाही कधीही मान्य करणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.