मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील आंदोलन तीव्र रुप धारण करतंय. परिणामी अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यस्था ढासाळली असून मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मराठा आरक्षणप्रश्नी सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी सुप्रिया सुळे आज विधान भवना आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली. तर, भाजपानेही या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा >> “आपण एका ताटात जेवलोय म्हणून सांगते…”, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सावधानतेचा इशारा; म्हणाल्या…
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
“महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था दीड-दोन महिन्यांपासून ढासळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. जालन्यात महिला आणि मुलांवर अमानुषपणे लाठीहल्ला गृहमंत्रालयाकडून करण्यात आला. कोयता गँग, ड्रग माफिया, मराठा, मुस्लीम आणि लिंगायत समाजाचे आरक्षण, अशा प्रश्नांवर सरकार अतिशय असंवेदनशील आहे. हे सगळं सरकारसह गृहमंत्रालयाचं अपयश आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा दिला पाहिजे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा >> “…म्हणून मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा”, सुप्रिया सुळेंची मोठी मागणी
भाजपाचं प्रत्युत्तर काय?
सुप्रिया सुळेंच्या टीकेनंतर भाजपानेही प्रत्युत्तर दिलं. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यासंदर्भात X वर पोस्ट केली आहे. “तुम्हाला सध्या जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. काय करणार सध्या तुम्हालाही दुसरा उद्योग नाही. ज्या देवेंद्रजींनी मराठा आरक्षण दिले, उच्च न्यायालयात कायम राहिले. पण, तुमच्या महाआघाडीच्या आणि त्या सरकारचे पालक शरद पवार यांच्या नाकर्तेपणामुळे ते पुढे टिकले नाही. तो विषय आता जुना झाला. काहीही घडले, की देवेंद्रजींचा राजीनामा मागायचा, हा उद्योग आता बंद करा आणि आपला उरला सुरला पक्ष कसा टिकेल, ते पहा. आजच तुमच्या पक्षाचा एक आमदार फुटून दुसऱ्या गटात गेला म्हणे!” अशी टीका करण्यात आली आहे.
चित्रा वाघ यांच्याकडूनही टीका
“राज्याच्या मोठ्ठ्या ताई… तुमची कावेबाज ‘माणुसकी’ प्रत्यक्षात हिडीस आणि ओंगळ आहे. ज्या पद्धतीनं परिस्थिती चिघळवणारी वक्तव्यं करताय त्यावरून तुमच्या खोटारड्या ‘माणुसकी’चा बुरखा टराटरा फाटलाय आणि हो, मोठ्ठ्या ताई, आपल्या भावाचा राग तुम्ही देवेंद्रजी यांच्यावर काढू नकात हा किंवा काढायचा प्रयत्न ही करू नका, कारण तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही. तुमचा चिडचिडेपणा का वाढला याचे कारण राज्यातील जनतेला पुरते ठावूक आहे. कावीळ झालेल्यांना जसं सगळं पिवळं दिसतं, तशी तुमची स्थिती झालीय. जळी-स्थळी तुम्हाला देवेंद्र फडणवीस दिसताहेत. हा आजार बरा नव्हे ताई…लवकर उपचार घ्या आणि बऱ्या व्हा”, अशी उपहासात्मक टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.