Madhya Pradesh Vidhan Sabha Election Result 2023 Updates, 3 December 2023 : मध्य प्रदेशात भाजपाचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार भाजपाने मध्य प्रदेशमध्ये चार जागांवर विजय मिळवला असून १६२ जागांवर पक्ष आघाडीवर आहे. तर, काँग्रेसने अद्याप खातं उघडलं नसून ६२ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातून भाजपासाठी अधिकृतरित्या गुड न्युज आली नसली तरीही आगामी दिवसांत मध्य प्रदेशात भाजपा सत्ता स्थापन करेल, असं चित्र निर्माण झालं आहे. या सर्व पार्श्वभूमवीर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि मध्य प्रदेशच्या सहप्रभारी पकंजा मुंडे यांनी एक्स पोस्ट करून भाजपाचे अभिनंदन केले आहे.
मध्य प्रदेशात लाडली बेहेन योजनेचा प्रचंड बोलबाला आहे. या योजनेमुळे महिला मतादारांचीही संख्या वाढली असल्याचं म्हटलं जातंय. याच योजनेचा उल्लेख करत पंकजा मुंडे यांनी मध्य प्रदेशातील भाजपा नेतृत्त्वांचं अभिनंदन आणि कौतुक केलं. पंकजा मुंडे म्हणाल्या, ही माझी तीव्र भावना आहे. मध्यप्रदेशातील अनेक प्रगतीशील योजनांपैकी शिवराजसिंग चौहान यांचे दोन महत्त्वाचे निर्णय म्हणजे ओबीसींचे आरक्षण वाचवणे आणि महिलांसाठी सक्षमीकरणासाठी लालडी बेहेन ही योजना आणणे, यामुळे पक्षाला आशीर्वाद मिळाला.
हेही वाचा >> मध्य प्रदेशमध्ये महिलाशक्ती भाजपची तारणहार!
त्या पुढे म्हणाल्या की, वसुंधरा राजे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे माझ्या अंतःकरणातून अभिनंदन. महिला मतदारांनी भाजपाला पसंती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदेश माणून त्यांचा संकल्प पूर्ण करणाऱ्यांचे अभिनंदन.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संघाचे नेते शिवप्रताप, शहांचे विश्वासू भूपेंद्र यादव व पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या चमूने मध्य प्रदेशच्या निवडणुकीची सूत्रे हाती घेतली होती. मतदानाच्या आधी दहा दिवसदेखील भाजपला जिंकण्याची खात्री देता येत नव्हती. भोपाळ, उज्जैन, इंदौर आदी काही महत्त्वाच्या शहरांमध्ये अमित शहांनी मॅरेथॉन बैठका घेऊन रणनितीमध्ये सातत्याने बदल केले होते. शिवराज भाजपसाठी प्रमुख प्रचारक असले तरी, त्यांच्यासोबत इतर नेत्यांनाही प्रचारात उतरवण्यात आले होते. शिवराज यांना कैलासविजयवर्गीय, नरेंद्र तोमर, ज्योतिरादित्य शिंदे, नरोत्तम मिश्रा या अन्य नेत्यांच्या रांगेत बसवले गेले. पण, शिवराज यांच्या ‘लाडली बेहना’ योजनेचा भाजपने प्रचंड प्रचार केला. मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या विजयाचे श्रेय ‘लाडली बेहना’ योजनेला द्यावे लागेल, असं जाणकारांचं मत आहे.