बांगलादेशी किंवा रोहिंग्यांना येथील जन्माचे प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसह विविध ठिकाणी पोलीस, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासाठी दौरे काढत असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार किरीट सोमय्या हे मंगळवारी परळीत दाखल झाले होते.

सोमय्या परळीत येत असल्याची माहिती मिळताच स्थानिक काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी शिवाजी चौक आणि एक मिनार चौकात सोमय्या यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. दरम्यान, सोमय्या यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यानुसार काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच ते सहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते, असे परळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी सांगितले.

किरीट सोमय्या यांनी मंगळवारी परळी तहसील व शहर पोलीस ठाण्यात जाऊन बैठका घेतल्या. यावेळी स्थानिक भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. माध्यमांसमोर बोलताना सोमय्या म्हणाले, महाराष्ट्राबाहेरच्या, बांगलादेशी किंवा रोहिंग्यांना परळी तहसीलमधून एक हजार २१४ जन्म प्रमाणपत्र रहिवासाशी संबंधित कोणतेही कागदपत्रे न पाहता दिलेली आहेत.

स्थानिक मुस्लिमांच्या अधिकारावर अतिक्रमण करण्याचा हा प्रकार आहे. हा प्रकार अत्यंत घातक आहे. यासंदर्भातील सुनावणीवेळी स्थानिक नगरपालिकेचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. ज्या माणसाचा पत्ताच नाही, अशा व्यक्तीलाही प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत. अशा चुकीच्या पद्धतीने रोहिंगे, बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्रांचे वाटप केल्याप्रकरणी बीडमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. परळीतही गुन्हा दाखल होणार असून, तहसीलदारांनी तक्रार दाखल करणार असल्याचे आपल्याला सांगितल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. या संदर्भाने परळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी सायंकाळपर्यंत तरी तहसीलदारांकडून कुठली तक्रार दाखल झालेली नव्हती. मात्र, त्यांच्या स्तरावरील प्रक्रियेचा भाग असू शकतो, असे स्पष्ट केले.

मी पुन्हा येणार

आपण पुन्हा एकदा पुढील आठवड्यात बीड जिल्ह्यात येणार आहोत, असे किरीट सोमय्या यांनी परळीत बोलताना स्पष्ट केले. परळीमध्ये सोमय्या यांनी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानालाही भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागतही करण्यात आले. मात्र, पंकजा मुंडे या परळीत नव्हत्या, अशी माहिती आहे.