बेकायदा दारूनिर्मितीसाठी वाडा तालुक्यात आवक वाढली; पोलिसांचा कानाडोळा

रमेश पाटील, लोकसत्ता

वाडा : वाडा शहर व आजुबाजूच्या ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर विक्री होत असलेल्या काळ्या गुळाचा वापर बेकायदा दारू निर्मितीसाठी केला जात असल्याचे उघड झाले आहे.

ग्रामीण भागात काळ्या गुळाची आवक मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. गावठी दारुच्या निर्मितीसाठी लागणारा काळा गूळ आणि  नवसागरची विक्री सध्या वाडा तालुक्यात  राजरोस सुरू आहे.  यात बेकायदा मद्यप्राशन करणारी पिढी वाढत असल्याचे चित्र आहे. या साऱ्या प्रकाराला रोखण्यासाठी पोलीस मात्र कठोर पावले उचलत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. काळा गूळ आणि नवसागर विक्रीवर शासनाने निर्बंध घातले आहेत. तरीही शहरी भाग व गावागावांत बहुतेक किराणा दुकानांमध्ये काळ्या गुळाची विक्री होताना दिसत आहे. ग्रामीण भागात  अनेक घरांमध्ये गावठी दारू बनवून ती विकली जाते. मात्र पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल, या भीतीने कुणीही तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या गावठी अवैध दारू विक्रीमुळे  ग्रामीण भागातील सामाजिक स्वास्थ बिघडले आहे. तरुण वर्गात गावठी दारू पिण्याचे प्रमाण वाढत असल्याबद्दल येथील काही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

कमी पैशांत गावठी दारू उपलब्ध होते. त्यामुळे ग्रामीण भागांतील मजुर  काळ्या गुळापासून तयार केलेल्या दारूच्या आहारी जात आहे.  त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.  यामुळे अशा व्यसनाधीन मजुरांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होत आहे.  पंचायत समिती अबिटघर गणाचे नवनिर्वाचित सदस्य जगदीश पाटील यांनी ग्रामीण भागातील हा प्रकार बंद करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

पोलीस पाटील डोळे मिटून

पोलिसांचे समन्वयक म्हणून गावोगावी पोलीस पाटील कार्यरत आहेत.  गावातील तंटे तसेच अवैध धंद्यांची माहिती पोलिसांपर्यंत पोचविण्यासाठी पोलीस पाटलांची महत्त्वाची भूमिका असते. मात्र ग्रामीण भागात अवैध दारुनिर्मितीची आणि वापरल्या जाणाऱ्या काळ्या गुळाच्या विक्रीची माहिती पोलिसांपर्यंत  पोचविण्याचे कर्तव्य गावातील पोलीस पाटलांकडून होताना दिसत नसल्याच्या तक्रारी काही महिलांनी केल्या आहेत. २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायतींच्या विशेष ग्रामसभांमध्ये महिला गावपातळीवर दारु बंदीचा ठराव मांडणार असल्याचे  वाडा तालुका बचत गट समन्वयक भावना पाटील यांनी सांगितले.

गावपातळीवरील महिला मंडळांनी याबाबत रितसर तक्रारी पोलीस ठाण्यात कराव्यात, त्यांची गंभीर दखल घेऊन कारवाई केली जाईल.

-जयकुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक वाडा पोलीस ठाणे</strong>

Story img Loader