आजरा तालुक्यातील पारपोली येथे वनतळय़ावर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात ‘ब्लॅक पँथर’ (काळा बिबटय़ा) बंदिस्त झाला. डौलदार चालीच्या ब्लॅक पँथरची छबीही कॅमेऱ्यात बंदिस्त झाली आहे. पूर्ण वाढ झालेल्या या बिबटय़ाच्या अस्तित्वाने आजरा तालुक्यातील जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
वन विभागाने जंगलातील प्राण्यांची नोंद व्हावी यासाठी कॅमेरे बसवले आहेत. मुख्य वनसंरक्षक (कोल्हापूर) एम. के. राव, गिरीश पंजाबी (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा तालुक्यात चाव्होबा व पारपोली येथेही पाण्याच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले होते. पाणी पिण्यासाठी वनतळय़ावर आलेले मोर, सांबर, ससे, डुक्कर आदी वन्य जीव १३ ते २९ मे या कालावधीत पारपोली येथील कॅमेऱ्यात बंदिस्त झाले. नुकतेच हे कॅमेरे काढून चित्रीकरण पाहिले असता ब्लॅक पँथरचे दर्शन झाले. पारपोली परिसरात ब्लॅक पँथरचा वावर असल्याची चर्चा होती. त्याला अधिकृत दुजोरा मिळाला असल्याचे परिक्षेत्र वन अधिकारी राजन देसाई यांनी सांगितले.

Story img Loader