सांगली : विज्ञानाच्या शोधामुळे मायाजालच्या जगात वावरत असताना इस्लामपुरात आज सकाळी महिलेच्या दारात करणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बकऱ्याचे मुंडके, पाय दोरीने बांधून दारात अघोरी पूजा करण्यात आली होती. अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी सर्व साहित्य पोत्यात भरुन पोलीसांच्या हवाली केले.
इस्लामपूर येथील ऊरुण भागात एका महिलेच्या दारात जादूटोणा आणि करणीचे प्रकार केल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून कुटुंबीयांचे, लोकांचे प्रबोधन करून पोलिसांच्या उपस्थितीत ते सर्व साहित्य बाजूला करून लोकांच्यात तयार झालेले भीतीचे वातावरण दूर केले.
इस्लामपूर शहरातील उरूण भागात एका महिलेच्या दारात जादूटोणा, करणीचे साहित्य आढळले. त्यांच्या बकऱ्याचे मुंडके चार पाय रंगीत दोरीने दरवाजाच्या बाहेर लटकवलेले होते. त्यावर लिंबू सुया व टाचण्या टोचलेल्या होत्या. दारातच तीन नारळाला काळया बाहुल्या दोऱ्याने बांधून त्यावरही टाचण्या लावलेल्या होत्या. २१ लिंबू अर्धवट कापलेले त्यावरही टाचण्या टोचलेले समोर ठेवलेले होते. त्याचबरोबर मिरच्या, काट्यांची फांजर, मोडलेली फांदी, पपई, कोरफडीचे तुकडे, तसेच हळदी, कुंकू, गुलाल त्यावर टाकलेला होता. परिसरात सर्व सामान्य लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरलेले होते.
हे सर्व पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. करणी करण्यात आल्याची घटना इस्लामपुरात घडल्याचे समजताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव श्री. बनसोडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जादूटोण्याचा प्रकार लज्ञशक्षात येताच त्यांनी इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांच्याशी संपर्क केला. काही वेळातच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. बनसोडे यांनी कुटुंबियांना आणि जमलेल्या लोकांना समजावून सांगितले, त्यांचे प्रबोधन केले.अशा गोष्टी करून कुणाचे चांगले किंवा वाईट होत नाही.आपण आधुनिक वैज्ञानिक युगातील आहोत त्यामुळे अशा अघोरी , अनिष्ट गोष्टींना न घाबरता सामोरे गेले पाहिजे. करणी ,जादूटोणा करणारे तसेच अंधश्रद्धेचा प्रचार प्रसार करणाऱ्या वर जादूटोणाविरोधी कायदे अंतर्गत गुन्हे दाखल केले जाऊ शकतात असे सांगत भयभीत झालेल्यांचे प्रबोधन केले.महिलेच्या दारातील सर्व साहित्य बनसोडे यांनी गोळा करून पोत्यात भरून पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर घटनेची तक्रार घरातील महिलेनी अज्ञाताविरोधात पोलिसांच्याकडे केली आहे.असाच अघोरी पूजेचा प्रकार कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणुन भोंदू बाबाला पोलीसांच्या हवाली केले होते.