रवींद्र जुनारकर
संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्यांची कृषी क्षेत्रात कमाल
नक्षलवाद्यांच्या रक्तरंजित कारवायांमुळे कायम दहशतीखाली असलेल्या गडचिरोली जिल्ह्य़ातील लक्ष्मण राजबाबू पेदापल्ली या प्रयोगशील युवकाने शिक्षणाची लक्ष्मणरेषा ओलांडून शेतीत आपले भवितव्य रुजवले आहे. लक्ष्मणने मधुमेहींसाठी लाभदायी अशा साखरविरहित काळ्या तांदळाची शेती फुलवली आहे.
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील गोदावरीच्या तिरावर वसलेल्या सिरोंचा तालुक्यातील लक्ष्मण पेदापल्ली याच्या मावशीचा तरुणपणी हृदयविकाराने मृत्यू झाला. मावशीला इतक्या तरुणपणात हृदयविकाराचा झटका का आला, असे त्याने डॉक्टरांना विचारले. त्यांनी मधुमेहामुळे, असे उत्तर दिले. तेव्हापासूनच लक्ष्मणने मधुमेहावर उपाय शोधण्यासाठी धडपड सुरू केली. तो नागपूर येथे संगणकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत होता. तसाही संगणकशास्त्र आणि शेती यांचा थेट संबंध नाही. तो अचानक गावात आला आणि शेतीवर लक्ष केंद्रित केले. काळ्या तांदळाचे उत्पादन मणीपूर राज्यात होत असून, त्याचे अनेक फायदे असल्याचे त्याच्या वाचनात आले. त्याने मणीपूर गाठले आणि तेथून दोन किलो काळ्या तांदळाचे बियाणे आणून लागवड केली. ९० दिवसांत त्याने पीक काढले. एका धानाच्या रोपापासून ४३.७५ ग्रॅम तांदूळ मिळाला. त्याने प्रति हेक्टरी ७२.३५ किलो उत्पादन काढले. या तांदळाच्या विक्रीमुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. लक्ष्मण सांगतो, मी काळे तांदूळ ऑनलाइन पद्धतीने ५०० ते १२०० रुपये प्रति क्विंटल दराने विकतो.
पूर्व विदर्भातील तीन-चार जिल्हय़ांमध्ये भात खाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मधुमेह असेल तर भात कमी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. परंतु जे भात खातात त्यांचे काय? लक्ष्मणने उत्पादित केलेला तांदूळ मधुमेहींसाठी उपयुक्त ठरू शकतो, असे म्हटले जाते. या प्रयोगशील शेतीसाठी त्याला ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार आणि ओमप्रकाश लांजेवार यांनीही बरीच मदत केली. आता लक्ष्मण स्वत: शेतकऱ्यांना या तांदळाची लागवड कशी करायची, पाणी कसे द्यायचे, किती द्यायचे इथपासून तर लागवडीसाठी कोणते वाण वापरायचे, कोणत्या काळात पीक घ्यायचे, यासाठी वातावरण कसे हवे आदी सर्व माहिती सविस्तर देतो.
साखरविरहित काळ्या तांदळचा प्रचार आणि प्रसार आता मोठय़ा प्रमाणात होत आहे. लोक त्याचे पीक घेऊ लागले आहेत. सिरोंचात आपण जशी शेती करीत आहोत तशीच शेती आता चंद्रपूरमध्ये प्रकाश कापरबोईना यांनीही सुरू केली आहे असे लक्ष्मणने सांगितले.
आरोग्यास लाभदायक
काळय़ा सुगंधी तांदळाच्या चाखो पोररिटॉन आणि चाखो अंबुबी या दोन जाती आहेत. दोन्ही जातींमध्ये डेल्फिनिडिन ३-गॅलॅक्टासाइड आणि प्रामुख्याने एन्थोकेनिन आहे. एकूण मोनोमेरिक एन्थोकेनिन आणि फिनॉलिक्स सुधारित पद्धतीने वापरून मोजली जातात आणि क्रमश फोलिन-सीओकाल्टूू पद्धतीमध्ये सुधारित केली जातात. आहारात काळ्या सुगंधित तांदळाचा नियमित पूरक वापर आरोग्यास लाभदायक असतो, असे संशोधन आहे.