पालघर : व्हॉट्सअपच्या वाढत्या वापरामुळे मागे पडलेले आणि मोबाईलद्वारे संदेशवहनातील अग्रणी ब्लॅकबेरी मॅसेंजर (बीबीएम) वर अखेरचा पडदा पडणार आहे. ब्लॅकबेरीची मालक कंपनी एम्टेकतर्फे ही मेसेजिंग सेवा येत्या ३१ मेपासून बंद करीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्याच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील स्पर्धा तसेच ब्लॅकबेरी व्यासपीठावर ग्राहकांना टिकवून ठेवण्यात कंपनीला आलेले अपयश या कारणांमुळे ही सेवा बंद करावी लागत असल्याचे ब्लॅकबेरीच्या ग्राहकांना स्वतंत्र संदेशाद्वारे अलिकडेच कळविण्यात आले आहे.
सध्या समाज माध्यम म्हणून लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सअप व त्यापूर्वी आलेल्या वेगवेगळ्या मेसेंजरच्या पूर्वीपासून ब्लॅकबेरी मेससेंजर जगभरात लोकप्रिय होता. विशषेत: व्यावसायिक व राजकीय क्षेत्रातील मंडळी आणि लब्ध प्रतिष्ठितांमध्ये या मेससेंजरमधील माहितीच्या गोपनीयता तसेच गैरवापराची शक्यता नसल्याने या सेवेकडे विश्वासार्हतेने पाहायचे.
ब्लॅकबेरी मेसेंजर मधील संदेश इंटरनेटच्या आधारे पाठवण्यात येत असला तरी ’ब्लॅकबेरी पिन’ च्या आधारे असलेल्या या मेसेंजर करिता एकेकाळी स्वातंत्र ब्लॅकबेरी डेटा प्लॅन घेणे बंधनकारक होते. या मेसेंजर ची ’रिसर्च इन मोशन’ या कंपनीकडे मालकी होती. २०१६ नंतर ती इंडोनेशियातील एम्टेक या कंपनीकडे आली. सध्या ब्लॅकबेरी मेसेंजर सर्वाधिकार तिच्याकडेच आहेत.
वर्ष २०१३ पर्यंत ब्लॅकबेरी हँडसेट फोनधारकांनाच या विशिष्ट सेवेचा वापर करता येत असे. २०१३ मध्ये अँड्रॉइड आणि आयओएस कार्यप्रणाली असणाऱ्या मोबाईल फोनवर ही सेवा उपलब्ध करण्यात आली होती. २०१५ पर्यंत जागतिक पातळीवर ब्लॅकबेरी मेसेंजरचे १९ कोटींहून अधिक वापरकर्ते होते.
ब्लॅकबेरी मेसेंजर बंद होत असले तरी ब्लॅकबेरी मेसेंजरची एंटरप्राइज आवृत्ती यापुढे सुरु राहणार आहे. सध्या ही एंटरप्राइज आवृत्ती गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून येत्या काही दिवसात अॅपल प्ले स्टोअरवर देखील उपलब्ध होत आहे. या सशुल्क एंटरप्राइज आवृत्तीला जगभरातील ग्राहक कसा प्रतिसाद देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.