खास सोलापुरी चादरी व टॉवेल उत्पादनामुळे सोलापूरचा वस्त्रोद्योग कसाबसा टिकून असताना गेले महिनाभर नोटाबंदीच्या माध्यमातून सुरू असलेल्या अर्थकल्लोळामुळे हा वस्त्रोद्योग मोठय़ा प्रमाणात मंदावला आहे. बाजारात सध्या लग्नसराईसह थंडीचा हंगाम असून देखील चादरी व टॉवेलची विक्री सुमारे ७० टक्क्य़ांपर्यंत थंडावल्याने उद्योजक व व्यापारी हवालदिल झाले आहेत.
सोलापुरी चादरीला ‘ब्रॅन्डनेम’ लाभले असून सोलापुरात येणारे पर्यटक व पाहुणे खास वेळ काढून सोलापुरी चादर व टॉवेल खरेदी करतात. अलीकडे वाढलेल्या स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोलापुरी चादरीचा दबदबा कमी झाला असला, तरी टेरी टॉवेलला विशेष मागणी कायम राहिली आहे. परंतु गेल्या ८ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या नोटाबंदीनंतर देशभर जो अर्थकल्लोळ माजला, त्याचा मोठा फटका चादरी व टॉवेल उद्योगाला बसला आहे. एकूण बाजारपेठच मंदावल्याने चादर व टॉवेल उत्पादक व व्यापारी अक्षरश: हवालदिल झाले आहेत. सध्या लग्न सराईबरोबरच थंडीचा हंगाम असताना चादरी व टॉवेलच्या मागणीत वाढ होण्याची व पर्यायाने बाजारपेठेत ग्राहकांची प्रचंड गर्दी होऊन तेवढय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल होण्याची अपेक्षा होती. परंतु नोटाबंदीमुळे संपूर्ण व्यवस्थाच बाधित झाली आहे.
सोलापुरात सुमारे १६ हजार यंत्रमाग असून त्यावर काम करणाऱ्या कामगारांची संख्या सुमारे ६० हजारांच्या घरात आहे. कामगारांना आठवडय़ातून कामाची मजुरी मिळते. परंतु निश्चलनीकरणामुळे कामगारांना गेल्या चार आठवडय़ांपासून फारच थोडय़ा मजुरीवर समाधान मानावे लागत आहे. प्राप्त परिस्थितीत कारखानदारांना आपल्या बँक खात्यातून आठवडय़ातून केवळ ५० हजारांची रक्कम काढता येते. ही अडचण समजून घेत कामगारांनी सहकार्याची भूमिका घेत मिळेल त्या मजुरीच्या रकमेवर समाधान मानले आहे. तर दुसरीकडे कच्च्या मालाच्या खरेदी-विक्रीवर परिणाम झाला आहे. त्यातून एकूण उत्पादनच घटले आहे. चादर व टॉवेल उत्पादन करताना त्यावरील डिझाइन महत्त्वाची असते. सोलापुरात अशी डिझाइन करणाऱ्या मंडळींची संख्या वीसच्या घरात आहे. प्रत्येकाला दररोज आठ ते दहा डिझाइनची कामे मिळत असत. परंतु आता नोटाबंदीचा फटका बसल्याने व एकूण उत्पादनच घटल्याने डिझाइनची कामेही कमी झाली आहेत. सध्या दररोज जेमतेम दोनतीनच कामे मिळत असल्याची माहिती या क्षेत्राशी संबंधित पांडुरंग संगा सांगताना चिंता व्यक्त केली.
शहरातील पूर्वभागात चादर व टॉवेलचे उत्पादन व विक्री मोठय़ा प्रमाणात होते. दाजी पेठेतील पुलगम टेक्स्टाईल्स व शोरूम प्रसिद्ध आहे. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, विजापूर येथील पर्यटनासाठी येणाऱ्या ग्राहकांची पुलगम शोरूममध्ये नेहमीच वर्दळ असते. परंतु गेल्या महिन्यापासून ग्राहकांची गर्दी पार ओसरली आहे. केवळ ३० टक्के विक्री होत आहे. यात देखील कॅशलेस सुविधांचा वापर करणाऱ्या ग्राहकांमुळे २० टक्के तर रोखीने व्यवहार करणाऱ्या ग्राहकांमुळे १० टक्के चादरी, टॉवेल, बेडशिट, सतरंजी आदी उत्पादनांची विक्री होत असल्याचे पुलगम शोरूमचे रमाकांत व्यंकटेश पुलगम सांगतात. लग्नसराई व थंडीचा हंगाम असूनही ही अवस्था आहे.
अलीकडे वस्त्रोद्योगावर मंदीचे सावट असताना त्यातून कशीबशी वाटचाल होत होती. सुदैवाने मागील दोनतीन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा चांगले पाऊसमान झाले. त्यातूुन पीक उत्पादन वाढल्याने शेतकरीवर्ग सावरला असताना यंदाच्या लग्नसराईचा हंगाम चादरी व टॉवेल उद्योगासाठी चांगला जाईल, असा विश्वास होता. दिवाळीत त्याची सुरुवातही झाली होती. परंतु अचानकपणे झालेल्या नोटाबंदीमुळे सारे गणितच बिघडल्याचे टेक्स्टाईल डेव्हलेपमेंट फाउंडेशनचे श्रीनिवास बुरा यांनी सांगितले.