रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आवारात बुधवारी दुपारी दुचाकीचा स्फोट होऊन एक पोलीस कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाला होता. रात्री उशीरा उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. निकेश पाटील असे पोलिसाचे नाव आहे.
निकेश पाटील श्रीवर्धन पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तो प्रशिक्षणासाठी अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात आला होता. बुधवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस मुख्यालयाच्या आवारात उभी असलेली मोटार सायकल निकेश सुरू करत असताना हा स्फोट झाला. या स्फोटात निकेश पाटील हा गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्यावर अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आणि अधिक उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले. मुंबईत उपचार सुरू असताना त्याचा बुधवारी रात्री मृत्यू झाला.
हा स्फोट नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या जागेपासून अवघ्या ५० मीटर अंतरावर पोलिसांचा शस्त्रसाठा आहे. त्यामुळे पोलीस याकडे गांभीर्याने पाहात आहेत. पोलिसांकडून श्वान पथक तसेच मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने तपासणी करण्यात आली आहे.
रायगड पोलीस मुख्यालयाच्या आवारात दुचाकीचा स्फोट, एका पोलिसाचा मृत्यू
ठिकाणी स्फोट झाला त्या जागेपासून अवघ्या ५० मीटर अंतरावर पोलिसांचा शस्त्रसाठा आहे
Written by रत्नाकर पवार
Updated:
First published on: 29-10-2015 at 02:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blast out side police station in alibaug