महात्मा गांधी जयंतीनिमित्त जिल्ह्यात पाच दिवसांपासून ग्रामसभा सुरू आहेत. गुरुवारी गेवराई (ता. नेवासे) येथे ग्रामसभा झाली. त्यातून विरोधी कार्यकर्त्यांच्या डोक्याला गावठी पिस्तूल लावून धमकावण्यात आले. नेवासे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गेवराई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दोन गटांत ही घटना घडली. उपस्थितांनी वेळीच मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. गावात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्तापरिवर्तन झाले. त्यानंतर आज पहिलीच ग्रामसभा चाल होती. मारुती मंदिराच्या कट्टय़ावर ग्रामसभेला सत्ताधारी सतरकर विरुद्ध पराभूत कर्डिले गट असे दोन्ही बाजूचे लोक उपस्थित होते. संपूर्ण ग्रामसभा तणावात पार पडली. सभा संपल्यानंतर सरपंच निर्मला पांडुरंग सतरकर यांचे पती पांडुरंग किसन सतरकर यांनी आभाराचे भाषण सुरू केल्यानंतर निवडणुकीचा विषय निघताच शाब्दिक चकमक उडाली. याबरोबर संदीप कर्डिले याने खुर्ची उगारून पांडुरंग यांच्याकडे धाव घेतली, त्याला उपस्थितांनी अटकाव केला. मात्र त्याने आपल्या खिशातून पिस्तूल काढून सतरकर यांच्या उजव्या कानशिलावर रोखले. उपस्थितांनी त्यास विरोध केला, त्यामुळे अनर्थ टळला.
माहिती मिळताच नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे घटनास्थळी दाखल झाले. कर्डिले याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, जिल्हा पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय कांबळे हे दोघेही नेवाशात दाखल झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद गोर्डे करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा