कडकडीत उन्हाळा! तोही मुंबईतला नाही तर नागपुरातला. चटके बसवणारे उन.. कारमधला एसीही गरम झाला होता.. रस्ते, हवा, सारे सारे काही रात्रीपर्यंत तापलेले ठेवणारा नागपूरचा उन्हाळा. अशा उन्हात पर्वणी काही असू शकते का? या प्रश्नाला एक उत्तर आहे ती पर्वणी आहे नागपूरजवळच्या जंगलात वाघ पाहायला जाण्याची. ऑफिसमधून सुट्टी मंजूर करून घेतली आणि खास कडाक्याच्या उन्हात नागपुरात गेलो. नागपूरच्या जवळच काही अंतरावर भंडारा आहे. या भंडाऱ्यापासून साधारण २५ ते ३० किमीचा फाटा आहे. तिथे आम्ही जाऊन पोहचलो. कोका नावाचे जंगल. कोका नावाचेच गाव. त्या गावातल्या गेस्ट हाऊसवर पोहचलो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
गेस्ट हाऊस परिसरातल्या झाडावर जमलेली माकडे

आता इच्छा होती ती वाघ पाहण्याची. पहाटेची सफारी घेतली होती. त्यामुळे संध्याकाळी पोहचून पहाट कधी होणार याची वाट पाहात होतो. २५ किमीचा जो फाटा आहे तो पूर्ण जंगलाचा परिसर आहे. हे जंगल ताडोबा जंगलाशीही जोडले गेले आहे. रस्त्यावरून जाताना दोन ते तीन छोटे छोटे चेकपोस्ट लागले. जे फलक वाटेत दिसत होते त्यावरही ‘वन्य प्राण्यांचा रस्ता’ प्राणी दिसल्यास आधी त्यांना रस्त्यावरून जाऊ द्या! असे फलक होते. एकंदरीत जंगल सफारी खूप आनंददायी ठरणार आणि त्यात वाघ दिसला तर पर्वणीच ठरणार हे प्रवास सुरु होताच जाणवले.

जंगल परिसरात असलेले चेक पोस्ट

माझ्यासोबत माझे कुटुंबीय होतेच. तीन लहान मुलीही. नेहेमी राणीच्या बागेत किंवा फारतर नागपूरच्या महाराज बागेत पिंजऱ्यात दिसणारे प्राणी प्रत्यक्ष पाहता येणार याचा आनंद काही औरच होता. कोका गावातील गेस्ट हाऊसवर पोहचलो… आणि या गेस्ट हाऊसच्या समोरच असलेल्या झाडाने आमचे लक्ष वेधले. एक दोन नाही साधारण ५० एक माकडांची टोळीच आमच्या समोरच्या झाडावर होती. त्यांच्यातल्या लीडरने आमच्या गेस्ट हाऊसवर येण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला परतवण्यात आम्ही यशस्वी ठरलो. संध्याकाळचे सहा वाजले होते. काळा चहा प्यायलो थोडी तरतरी आली. गेस्ट हाऊसच्या बाहेर असलेल्या हिरवळीवर झाडांना मनसोक्त पाणी दिले. पाण्यात पाय बुडवून किती तरी वेळ बसलो खूपच वेगळे वाटले.

मोबाइलला रेंज नव्हती ही सर्वात आनंददायी बाब! मग हळूहळू सूर्य मावळतीला जाऊ लागला. संध्याकाळचे सात वाजले तेव्हा आभाळात भगवा रंगाने एक वेगळीच छटा उमटवली होती. ते पाहून मन प्रफुल्लित झाले. रात्री ८ वाजता जेवण केले… साधेच पण सुमधुर चवीचे सुग्रास जेवण! वरण भाताची चव तर अजूनही जीभेवर रेंगाळतेय. आता उत्सुकता होती ती वाघ पाहण्याची. तोपर्यंत लोकांशी बोललो त्यांनी सांगितले की बऱ्याचदा वाघ दिसतोच…

पहाटेचे ५ कधी वाजतील असे झाले होते. अखेर ती वेळ आली… पहाटे ५ ला उठून लवकरच जंगल सफारीसाठी आम्ही सगळे निघालो. सुरुवात झाली ती हरणांपासून. बारशिंगा, चितळ अशा प्रकारची हरणे पाणवठ्यावर आली होती. आमच्या गाईडने आम्हाला सांगितले, इथले प्राणी अजून लाजरे आहेत साहेब. जिप्सीचा थोडासा आवाज आला तरीही पळतात… तसेच झालेही. काळ्या तोंडाची माकडे तर जागोजागी दर्शन देत होती. अचानक समोरून एक, दोन शिकारी कुत्रेही गेले. प्राण्यांच्या वस्तीत शिरत असताना फक्त झाडांची काहीशी सळसळ आणि जिप्सीचा आवाज इतकेच होते. घनदाट जंगलात आम्ही शिरलो.. किंगफिशर, भारतद्वाज, बुलबुल, सुतारपक्षी हे सगळे जण दर्शन देत होतेच. अशातच स्वर्गीय नर्तक नावाच्या एका पक्षाची ओळख झाली. हा पक्षी आम्हाला दिसला आणि स्मरणात राहिला तो त्याच्या लांबसडक शेपटीमुळे.. हवेत एखादी लकेर काढावी तशी उडताना त्याची शेपटी दिसली…

कोका जंगलातली संध्याकाळ

हे दृश्य डोळ्यात साठवून आम्ही पुढे निघालो. नजर अजूनही वाघ दिसतोय का ते पाहात होतीच. तेवढ्यात एक टेकडीसारखा भाग आला.. तिथे आम्हाला अस्वल दिसले. हे अस्वल पाहण्यासाठी आमच्या जिप्सीच्या ड्रायव्हरने गाडी थोडीशी मागे घेतली आणि मग ते अस्वलही थोडे नीट पाहता आले. दरम्यानच्या काळात आम्हाला आमच्या गाईडने हे सांगितले होते की आपण जंगलाचा फक्त २० टक्के भागच पाहणार आहोत कारण बाकीचे ८० टक्के जंगल सफारीसाठी राखीव नाही तर फक्त प्राण्यांचा तिथे मुक्त संचार असतो. एक-दोन ठिकाणच्या पाणवठ्यांवर माकडांचा कळप पुन्हा आमच्या स्वागतासाठी तयार होताच! तर एका पाणवठ्यावरून परतलो तेव्हा गाईडने आम्हाला अस्वलाची आणि बिबट्याची पावले दाखवली. ते काही सेकंदापुरतेच तिथे येऊन गेले, त्याक्षणी वाटले अरे पुढे गेलोच नसतो तर कदाचित बिबट्या तरी पाहायला मिळाला असता.

जंगलातला पाणवठा

आमच्या जंगल सफारीचा चौथा टप्पा सुरु झाला तेव्हा तरी वाटले की वाघ दिसेल. मात्र या संपूर्ण सफारीत आम्हाला वाघाचे दर्शन झालेच नाही. ते झाले असते तर फारच छान वाटले असते. मात्र वाघ आपल्याला दिसेल अशी आशा आम्हाला शेवटपर्यंत होती. अगदी परतीच्या प्रवासातही वाघ एकदा दिसेल का? अशी आशा मनात होतीच. जंगलात फिरण्याची धमाल आम्ही अनुभवली आणि दिवस मावळतीकडे जाताना आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आम्ही त्याला शोधले, तो भेटण्याची आशा बाळगली, पण वाघ भेटला नाही.. मात्र जंगलातला त्याचा वावर त्याच्या ठशांच्या मार्फत जाणवला. आम्ही परतलो त्याच्या भेटीची आशा मनात ठेवून!

समीर चंद्रकांत जावळे

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog on nagpur jungle safari tiger search