वेगाने वाऱ्याला चिरून पुढे झेपावणारा ‘गोल्डन रनर’ उसेन बोल्ट. भारतीय संघातील ‘रनमशिन’ विराट कोहली. सिल्व्हर स्क्रिनवरचा रजनी. जपानमध्ये एकाच वेळी एका ठिकाणी २५० स्त्री- पुरुषांनी केलेला संभोग. तासाभरात सर्वाधिक फुग्यात हवा भरणारा हंटर इवान. अशा वेगवेगळ्या विश्वविक्रमांच्या यादीत आता भारतातील एका विक्रमाचा समावेश करावा लागेल. मंत्रालयाच्या साक्षीनं हा योग आलाय. कारण सात दिवस, दिवसाचे २४ तास, तासाचे ६० मिनिटं आणि प्रत्येक मिनिटांचे ६० सेकंद. प्रत्येक दोन सेकंदाला एक अशी सलग उंदरं मारण्याची कमाल राज्याचं सर्वोच्च ठिकाण असलेल्या मंत्रालयात करून दाखवलीय. त्यामुळे या विश्वविक्रमाची नोंद घ्यायलाच हवी. मंत्रालयाचा कारभार लालफितशाहीत अडकलाय असं म्हणणाऱ्यांना किमान यामुळे तरी इथे अशक्य काहीच नाही याचा प्रत्यय आला असेल. गारपिटीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी मंत्रालयात लाथा बुक्क्या खाल्लेले भुसे. जमीन अधिग्रहित होऊन मोबदला मिळाला नाही म्हणून मंत्रालयाच्या पायऱ्यांवर जीव दिलेले धर्मा पाटील आणि त्यांच्यासारखीच विविध कामं घेऊन मंत्रालयाच्या पायऱ्या चढणाऱ्यांनी आता निराश व्हायला नको. कारण कामाला सुरुवात झाली आहे. पांढरे, काळसर, मोठे, लठ्ठ तर काही लहान अशा ३ लाख १९ हजार ४०० उंदरांचा बंदोबस्त मंत्रालयात करण्यात आला. विशेष म्हणजे दोन महिन्यात करायचं काम अवघ्या सात दिवसात पूर्ण केलं. नाथाभाऊंनी त्याची सभागृहात माहिती दिली म्हणून कामचुकारपणाचा शिक्का तरी पुसला.
उंदीर मारणं तसं खायचं काम नाही. ‘चुहे एक बार खाकर मरे घर के बाहर जाकर’ अशी जाहिरात बघून औषध ठेवावं तर औषध खाऊन ते मरतील याची शाश्वती नाही. मेलेच तर ते घराबाहेर जाणार नाहीत. कोणत्या तरी कोपऱ्यात, कपाटात, कपाटाच्या मागे किंवा दिवाणच्या फटीत मरतात. चार दिवसानंतर घरभर वास सुटल्यानंतर आपण उंदराचा वध केला याची माहिती मिळते. मग वासाच्या मागावर त्याची शोध मोहीम सुरू केली जाते. घरातील मोठ्यापासून चिल्ल्या-पिल्यांपर्यंत सर्वजण कामाला लागतात. मग कधी तासाभरात तर कधी जरा लवकर मृतदेहाचा शोध लागतो. मग युद्ध जिंकावं असा आनंदी आनंद. हा झाला अलीकडच्या काळातील उपाय. थोडं त्याच्या अगोदर उंदीर मारण्यासाठी एक विशिष्ट खटका बनवला जायचा. त्याच्या तोंडाला शेंगदाणा किंवा लहान मुलं खातात त्या मुरकुलच्या नळ्या ठेवल्या जायच्या. एखादा भोळा उंदीर त्यात सापडायचा तर चाणाक्ष शेंगदाणा खाऊन फरार व्हायचा. उंदीर मारण्याच असं काम अनेकांनी केलं असेल. त्यामुळे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी जे काम केलं ते मोठं दिव्यच की, कारण कोट्यवधींच्या संख्येनं असलेले उंदीर शोधून शोधून सेकंदात मारले. फक्त तेवढंच नाही. तर त्याचा कोणाला वास देखील येऊ दिला नाही. अगदी सहज ‘उंदीरमुक्त’ मंत्रालय केलं. अधिकाऱ्यांनी योग्य व्यक्तींना काम दिलं. म्हणून ते पूर्णत्वास गेलं. कोणाला द्यायचं हे ठरवायला ही अक्कल लागते.
मंत्रालयात उंदीर पुराण सुरू आहे. हे उंदीर भलतेच करामती असतात. कधी पोलिसांनी मोठ्या मेहनतीने धाड टाकून जप्त केलेली दारू पिऊन टाकतात आणि देशाचा महसूल गिळतात. तर कधी अतिशय महत्वाची फाईल कुरतडतात. त्यामुळे बिचाऱ्या अधिकाऱ्यांच्या डोक्याला ताप होतो, असे प्रकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत घडतात. त्यामुळेच हजारो टन वजनाच्या लाखो उंदरांची गतिमान प्रशासनासाठी योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावली. अन् नवा विश्वविक्रम बनवला. आता गतिमान कारभार पारदर्शक असावा यासाठी शासकीय योजनांच्या फाईल कुरतडून हजारो कोटींचा निधी गिळणाऱ्या ‘शासकीय उंदरांना’ देखील ठेचायला हवं. तरच खऱ्या अर्थाने उंदरांच्या सापळ्यात अडकलेलं मंत्रालय आणि सर्वच शासकीय कार्यलयाची सुटका होईल. देश काँग्रेस मुक्त किंवा मोदी मुक्त होवो अथवा न होवो. ‘उंदीरमुक्त’ व्हावा. त्याची नितांत गरज आहे. तसं झालं तर उंदरांच्या सापळ्यात अडकलेली शासकीय कार्यालय मोकळा श्वास घेतील. तो होईल हा आशावाद ठेऊ…