– कीर्तिकुमार शिंदे
महाराष्ट्रातील मराठी जनतेला राजकीय विचारांच्या पातळीवर तब्बल २५ वर्षं मागे नेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विजयादशमीला अनोखं रिव्हर्स – उलटं सीमोल्लंघन केलं आहे. राजकारणात पुढे जाण्यासाठी कधीकधी दोनचार पावलं मागे यावं लागतं खरं, पण त्यासाठी विचार मात्र नवाच लागतो. उद्धव ठाकरे यांना मात्र विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात ज्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणामुळे देशात आगीचा आगडोंब उसळला, धार्मिक दंगली झाल्या, शेकडो लोकांना नाहक आपला जीव गमवावा लागला, त्या राम मंदिराच्या मुद्द्याचा भाजपविरोधात लढण्यासाठी आश्रय घ्यावा लागला, हे एकविसाव्या शतकातील शिवसेनेचे आणि महाराष्ट्राचेही खूप मोठे दुर्दैव आहे, असं अत्यंत खेदाने म्हणावे लागत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या चार वर्षात एकदाही अयोध्येला गेले नाहीत, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी ते स्वतः येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येला जाऊन मोदी सरकारला जाब विचारणार असल्याचं जाहीर केलं आहे. अयोध्या विवादाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना आणि त्यासंदर्भात कोणतेही तात्कालिक कारण नसताना उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे, मात्र हे प्रकरण त्यांच्याच अंगलट येऊ शकते, याची कल्पना त्यांच्या (अ)विचारी ‘सामना’वीरांनी त्यांना दिलेली नसावी.
भाजपच्या सरकारात सहभागी होऊनही गेली चार वर्षं शिवसेना उठताबसता भाजपवर टीका करत आहे. मात्र ही टीका केल्यावर शिवसेना आमदारांनी कधीही त्यांच्या खिशातील राजीनामे बाहेर काढले नाहीत. “आम्ही राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडू” हा शिवसेनेचा इशारा आता राजकीय विनोदाचा विषय झाला आहे. त्यामुळे एके काळच्या कमळाबाईने तथाकथित वाघाला आपल्या ताटाखालचे मांजर केल्याचे व्यंगचित्र महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यासमोर उभे राहिले. हे व्यंगचित्र पुसायचे असेल तर भाजपला कोंडीत पकडणे शिवसेनेच्या राजकीय अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक होते आणि अयोध्येचा मुद्दा उचलून आपण भाजपवर कुरघोडी करू शकू, असा शिवसेनेच्या चाणक्यांचा अंदाज होता. म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी म्हणजे २७ जुलै रोजी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मातोश्रीजवळच चलो अयोध्याचे कमर्शियल होर्डिंग लावले होते. शिवसेना राम मंदिराचा मुद्दा पुन्हा उकरून काढणार याचे संकेत खरंतर तेव्हाच मिळाले होते.
आता उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात याबाबतची जाहिर घोषणा केली आहेच, तर काही गोष्टीची उजाळणी करावीच लागेल.
– राम मंदीर हा मुद्दा भाजपने देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणला होता, शिवसेनेने नव्हे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भाजप यांनी १९८७ ते ९० दरम्यान अयोध्येचा मुद्दा तापवला आणि त्यातून निर्माण झालेल्या हिंदुत्वाच्या लाटेवर आपल्या अचूक टायमिंगमुळे बाळासाहेब स्वार झाले आणि पुढे आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी हिंदुत्वाच्या राजकारणाचे नेतृत्व केले.
– “शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडली असेल, तर मला त्यांचा अभिमान आहे”, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. त्याचं हे वाक्य म्हणजे बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली याचा पुरावा नसून बाळासाहेबांच्या हजरजबाबीपणाची ती साक्ष आहे.
– १९९२-९३ च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंची बाजू अत्यंत आक्रमकपणे मांडून आपणच हिंदुंचे एकमेव कैवारी असल्याचे सिद्ध केले.
– असं असतानाही नंतरच्या काळात बाळासाहेबांनी अयोध्येच्या वादग्रस्त स्थळी मंगल पांडे यांचे राष्ट्रीय स्मारक किंवा रुग्णालय उभारावे, अशी सामोपचाराची भूमिका जाहिरपणे मांडली होती.
– याच संदर्भातील अत्यंत नजीकच्या काळातलं एक महत्वाचं उदाहरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे याचं आहे. “भाजप जी आश्वासनं देऊन देशात पसरला, त्यातील सर्वात महत्वाचं आश्वासन म्हणजे अयोध्येत राम मंदीर उभारणे. अयोध्या आंदोलन भाजपने अर्धवट सोडलं”, असा जाहीर आरोप राज ठाकरे यांनी याच वर्षीच्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केला होता. पण देशातील धार्मिक जातीय वातावरण पाहता राम मंदिर एक वर्ष उशीराने झालं तरी चालेल, अशी सम्यक भूमिका राज ठाकरे यांनी याच भाषणात मांडली होती. ही भूमिका म्हणजे राज यांच्या परीपक्व राजकारणाचा आदर्श नमुनाच होता.
– राम मंदीराबाबत भाजपने देशातील हिंदुंची फसवणूक केल्याचा मुद्दा राज ठाकरे यांनीच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सर्वप्रथम जाहिरपणे उपस्थित केला होता, शिवाजी पार्कवरच; मात्र हा मुद्दा उपस्थित करूनही त्यावरून राजकीय स्वार्थ साधण्याची भूमिका राज यांनी घेतली नाही.
अयोध्येत राम मंदीर उभारण्याबाबत कायदा करायला हवा, अशी भूमिका रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही काल सकाळच्या नागपुरमधील दसरा मेळाव्यात मांडली. संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर हाच विचार अधिक आक्रमकपणे मांडला. आपण २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येला जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर अयोध्येत कधीही गेले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. पण एक गोष्ट ते सपशेल विसरले. बाळासाहेबांनी अयोध्येचा मुद्दा देशात सर्वाधिक आक्रमकपणे मांडला. अनेकदा त्यासंदर्भात जाहीरपणे त्यावेळच्या भाजपच्या दिग्गज राजकीय नेत्यांचा पाणउताराही बाळासाहेबांनी केला. पण राजकीय कुरघोडी करण्यासाठी किंवा अयोध्या मंदीर बांधण्यासाठी बाळासाहेब कधीही अयोध्येला गेले नाहीत. त्यांना जे म्हणायचं होतं, जे काही साध्य करायचं होतं, ते त्यांनी इथे मुंबईत, महाराष्ट्रात बसूनच केलं.
बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला आणि मराठीचा मुद्दा शिवसेनेच्या अजेंड्यातून आपोआप पुसट होत गेला. कालच्या घोषणेमुळे उद्धव ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा आता कायमचा पुसून टाकल्यात जमा आहे!