प्रक्रिया न करताच कारखान्याकडून नाल्यात सांडपाण्याचा निचरा
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील काही कारखानदार रासायनिक सांडपाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता नाल्यात निचरा करतात. औद्योगिक वसाहतीमधील ‘एम झोन’मध्ये निळ्या रंगाचे रासायनिक सांडपाणी सोडण्यात आले असून हे पाणी रस्त्यावरही आले आहे. याबाबत कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक सांडपाणी नैसर्गिक नाल्यात किंवा पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी बनवण्यात आलेल्या गटारामध्ये रात्रीच्या वेळी रासायनिक सांडपाणी सोडण्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. अशीच घटना औद्योगिक क्षेत्रातील ‘एम’ झोनमध्ये घडली असून रासायनिक निळ्या रंगाचे सांडपाणी मुख्य सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीतून बाहेर पडून बाजूला असलेल्या नाल्यातून संपूर्ण परिसरात जमा झाले होते. हे पाणी नेमके कोणत्या कारखान्यातून सोडले होते, ते समजू शकले नाही.औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांना आपल्या कारखान्यातून निघणारे रासायनिक सांडपाणी प्रक्रिया करून सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या वाहिनीमध्ये सोडणे बंधनकारक असते. परंतु असे असले तरी काही कारखानदार आपल्या कारखान्यातील सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद ठेवून रात्रीच्या वेळी कारखान्यातील रासायनिक सांडपाणी थेट सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या वाहिनीत सोडत असतात. यामुळे या रासानिक सांडपाण्यामध्ये असलेला गाळ हा वाहिनीमध्ये अडकल्याने चेंबरमधून रासायनिक सांडपाणी बाहेर पडते. त्यामुळे या परिसरात प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.