कर्जवसुलीच्या मुद्दय़ावर रिझव्र्ह बँकेने घातलेले र्निबध कायम असतानाच रुपी को-ऑप. बँकेचे संचालक मंडळ अखेर मंगळवारी बरखास्त करण्यात आले. साखर आयुक्तालयातील सहसंचालक (अर्थ) संजय भोसले आणि महाराष्ट्र सहकारी बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर या दोन सदस्यांचा समावेश असलेले प्रशासक मंडळ यापुढे बँकेचा कारभार पाहणार आहे.
रिझव्र्ह बँकेचे कार्यकारी अधिकारी कुरुप्प स्वामी हे एका कार्यक्रमासाठी मंगळवारी पुण्यात आले होते. त्यावेळी कुरुप्प स्वामी यांनी संजय भोसले आणि विद्याधर अनास्कर या दोन प्रशासक मंडळाच्या नावांची घोषणा केली. संजय भोसले हे या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष असून विद्याधर अनास्कर सदस्य म्हणून काम पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी संचालक मंडळाने कुरुप्प स्वामी यांची भेट घेऊन या आर्थिक र्निबधातून निवृत्तिवेतनावर अवलंबून असलेले ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि विद्यार्थी खातेदारांना सूट द्यावी, अशी मागणी केली.
आर्थिक र्निबध
कर्जवसुलीमध्ये आलेले अपयश आणि संचालक मंडळातील वाद यामुळे रिझव्र्ह बँकेने रुपी बँकेवर तीन दिवसांपूर्वी (२३ फेब्रुवारी) आर्थिक र्निबध घातले. या र्निबधांनुसार खातेदारांना सहा महिन्यांतून एकदाच बँकेतून एक हजार रुपये काढता येणार आहेत. तर, ठेवीदारांना त्यांच्या ठेवी काढून घेता येणार नाहीत. त्यामुळे खातेदार आणि ठेवीदार यांच्यापुढे संकट निर्माण झाले. संचालक मंडळातील सहा संचालकांनी दिलेले राजीनामे परत घेऊन मंडळामध्ये एकजूट दाखविण्याचा प्रयत्न झाला. पण, अखेर संचालक मंडळाच्या बरखास्तीने या नाटय़ावर पडदा पडला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा