भीमा नदीपात्रामध्ये कर्जत, श्रीगोंदे, दौंड या तालुक्यांमध्ये बेकायदेशीररीत्या वाळूतस्करांनी पुन्हा एकदा नदीपात्रामधून जोरदार वाळूउपसा सुरू केला आहे. कर्जत येथील नायब तहसीलदार यांनी काल दिनांक ४ रोजी सिद्धटेकजवळील मलठण परिसरामध्ये धाडसी कारवाई करताना पाठलाग करून तीन बोटी पकडल्या व त्या स्फोट करून फोडल्या व नदीपात्रामध्ये बुडवल्या.
कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या पात्रामध्ये आज राजरोस बेकायदेशीर वाळूउपसा सुरू आहे. पुणे व नगर जिल्हय़ातील वाळूतस्कर यामध्ये सहभागी आहेत. काल दिनांक ४ रोजी कर्जतचे प्रभारी तहसीलदार जयसिंग भैसडे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने सिद्धटेक व परिसरामध्ये छापे टाकले. नदीपात्रामध्ये त्यांनी खासगी बोटीमधून या वाळूतस्करांचा पाठलाग केला, मात्र अनेक जण पळून गेले. यामध्ये मलठण गावाजवळ तीन बोटी त्यांना वाळूउपसा करताना सापडल्या असता त्यांनी लगेच तिचा ताबा घेतला व या सर्व बोटी ब्लास्टिंग करून फोडून टाकल्या व नंतर नदीपात्रामध्ये बुडवल्या. यामध्ये एक सक्शन पंपदेखील होता, मात्र या बोटीवरील तस्कर पळून गेल्याने त्यांच्यावर कारवाई करता आलेली नाही.
मात्र या भरारी पथकाची महसूलमधील एका कर्मचाऱ्यानेच माहिती तस्करांना कळवली, त्यामुळे हे पथक निघण्यापूर्वी असलेल्या नदीपात्रामधील असंख्य बोटी गेल्या होत्या अन्यथा मोठी कारवाई करता आली असती अशी खंत नायब तहसीलदार जयसिंग भैसडे यांनी व्यक्त केली. मात्र आपण या पुढेही कारवाई सुरूच ठेवणार आहे असे त्यांनी सांगितले. काल कारवाई झाली तरीही आज पुन्हा वाळूतस्करांच्या असंख्य फायबर बोटी नदीपात्रामध्ये वाळूउपसा करीतच होत्या.
भीमा नदी ही पुणे जिल्हय़ामधून श्रीगोंदे व कर्जत तालुक्यांमधून वाहते व पुढे सोलापूर जिल्हय़ामध्ये जाते. या नदीपात्रामध्ये कोठेही अधिकृत लिलाव झालेला नाही. या नदीपात्रामध्ये आज मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा आहे, मात्र पुरामुळे वाळूही मोठय़ा प्रमाणामध्ये वाहून आलेली आहे. पाणी जादा असले तरी ते आता संथ झाले आहे. याचा फायदा घेत पुणे, नगर व सोलापूर जिल्हय़ामध्ये छोटय़ा छोटय़ा गावांचा आधार घेत प्रचंड प्रमाणात वाळूउपसा बेकायदेशीरपणे सुरू आहे. आता नवीन फायबर बोटी निघाल्या आहेत. या सक्शन पंपाच्या साहाय्याने रोज हजारो ब्रास वाळूउपसा राजरोस सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा