Pahalgam Terror Attack Six tourists from Maharashtra killed : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी (२२ एप्रिल) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात एकूण २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तसेच एका लहान मुलासह २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. यात डोंबिवलीमधील तिघे, पुण्यातील दोन व पनवेलमधील एका रहिवाशाचा समावेश आहे. दरम्यान, या हल्ल्यात ठार झालेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांचे पार्थिव आज मुंबई व पुण्याला आणले जातील. राज्य सरकारने तशी व्यवस्था केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबाबतची माहिती दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातील ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातील मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे पार्थिव आणि नातेवाईकांना पुन्हा राज्यात आणण्याची प्रक्रिया सरकारच्या वतीने सुरू झाली आहे. मी स्वतः यासंदर्भात बारकाईने आढावा घेत असून सर्वांशी समन्वय साधून आहे. श्रीनगर येथे या पर्यटकांचे पार्थिव आणि त्यांच्या नातेवाईकांना विमानात बसवून देण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर आणि त्यांची टीम काल रात्रीच श्रीनगरमध्ये पोहोचली आहे. तर, मुंबईत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे समन्वयासाठी उपस्थित राहणार आहेत.”
श्रीनगरमध्ये अडकलेल्या इतर पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत : शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “श्रीनगरमध्ये अडकलेल्या इतर पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी शिवसेनेची एक टीम श्रीनगरमध्ये तळ ठोकून आहे. या घटनेतील संजय लेले आणि दिलीप देसले यांचे पार्थिव श्रीनगर-मुंबई एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. हे विमान आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मुंबईसाठी निघालं आहे. तर, पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव संध्याकाळी ६ वाजता निघणाऱ्या विमानाने पुण्यात आणले जाईल. तर डोंबिवलीचे रहिवासी असलेल्या हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन येणारे विमान १ वाजून १५ मिनिटांनी निघून मुंबईला पोहोचेल.”
हल्लेखोरांना पकडण्यासाठी काश्मीर खोऱ्यात संरक्षण यंत्रणेची शोधमोहीम
दरम्यान, या हल्यामागचा सूत्रधार व हल्लेखोरांची ओळख पटवण्यात संरक्षण यंत्रणेला यश मिळालं असून त्यांचा एक फोटो व काही स्केच गुप्तचर यंत्रणेने जारी केले आहेत. तसेच हल्लेखोरांबाबतची माहिती मिळाली असून या माहितीच्या आधारावर काश्मीर खोऱ्यात हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.