जिल्ह्य़ातील माहूर, लोहा व कंधार या तीन तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये शुक्रवारी दुपारी-संध्याकाळी वीज कोसळून सहाजण ठार, तर महिलेसह तीनजण जखमी झाले. पावसात वीज कोसळून एकाच दिवशी मोठय़ा संख्येने बळी गेल्याने जिल्हा हादरला.
माहूर तालुक्यातील मौजे लांगी गावात दुपारी साडेतीनच्या झाडावर वीज कोसळून दोन मुलांसह वडिलांचा होरपळून मृत्यू झाला. किशन रेक्कमवार (वय ६०), त्यांची मुले अनंता (वय ३०) व रवींद्र (वय २५) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. हे तिघेही शेतात काम करीत होते. मात्र, या वेळी अचानक वादळी पाऊस सुरू झाला. त्यामुळे हे तिघेही आश्रयासाठी शेतातील झाडाखाली थांबले. परंतु त्याच वेळी वीज कोसळली. त्यात अनंता व रवींद्र या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे वडील किशन गंभीर जखमी झाले. त्यांना लोकांनी उपचारार्थ माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे प्रथमोपचार करून यवतमाळला नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. माहूर पोलिसांनी या घटनेची नोंद केली.
लोहा तालुक्यातील धानोरा मक्ता येथे नागेश ज्ञानोबा भुजबळ (वय १०) हा मुलगा म्हैस घेऊन घराकडे येत होता. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. कंधार तालुक्यातील ब्रह्मवाडी येथे सोपान वामन पंदेवाड (वय ३५) व दत्ता ज्ञानोबा शेंद्रे (वय ३२) या दोघांचा वीज कोसळून मृत्यू झाला, तर टोकवाडी येथे मुक्ता शंकर मुसळे (वय १२), धना सोपान गौड व राजाबाई हरि तेलंग हे तिघे जखमी झाले.

Story img Loader