लोकसत्ता वार्ताहर

परभणी : जिल्ह्यातील गंगाखेड, पालम, सोनपेठ व जिंतूर या चार तालुक्यातील महसूल मंडळात अस्तित्वात नसलेल्या गावांचा पिकविमा काढून जवळपास ६५ कोटींचा बोगस पिकविमा उचलल्याचा प्रकार घडला आहे. या बोगस पिकविमा प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह पीक विमा उचलणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी केली आहे. महसूल मंडळ व कृषि विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोट्यवधी रूपयाचा बोगस पिकविमा उचलून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोषीवर कारवाई न केल्यास या प्रकरणी आपण उग्र आंदोलन करू असेही ते म्हणाले.

परभणी जिल्ह्यातील १७ गावाला महसूल मंडळ नसतानाही खरीप हंगामातील २६ हजार १४९ हेक्टरवरील पिक नुकसानीचा पिकविमा महसूल व कृषि विभागाने दाखवून कोट्यवधी रूपयाचा पिकविमा उचलून शासनाची फसवणूक केल्याचे यावेळी खासदार जाधव यांनी नमूद केले. बोगस पिकविमा तयार करणारा झारीतील शुक्राचार्य कोण आहे याचा शोध घेऊन हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घ्यावे याकडे खासदार जाधव यांनी लक्ष वेधले आहे.

परभणी जिल्ह्यात खरीप हंगामाचा पिकविमा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भरला होता. तसेच प्रशासनाने अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या महसूल मंडळनिहाय सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सोनपेठ, पालम या तालुक्यातील काही गावे महसूल मंडळात नसतानाही पिकविमा देण्यात आला आहे. यामध्ये गंगाखेड तालुक्यातील आनंदनगर ५२४८.९९ हे., जिंतूर तालुक्यातील अंगलगव्हाण तांडा ४९३.१६ हे., केहाळ तांडा ६२.९५ हे., लिंबाळा ५५२.११ हे., पोखर्णी तांडा ८६१.३९ हे., सेवालाल नगर १४५.१ हे., तेलवाडी ८३३.६ हे., पालम तालुक्यातील मौजमाबाद तांडा १०००.२५ हे., रामपुर तांडा ३७८१.२५ हे., सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा २९१२.२७ हे., कौथळा तांडा ३९९.९५ हे., मानशिराम तांडा १०९०.२९ हे., रेवा तांडा ३६२५.३९ हे., सखाराम तांडा ९१२.६८ हे., सोनपेठ १३७७.४४ हे., सोनपेठ २३०६.८१ हे., तुकाई तांडा ५४६.३३ हेक्टर असे एकूण २६ हजार १४९ हेक्टरवरील पिकविमा दाखवून जवळपास ६५ कोटी रूपयांचा बोगस विमा उचलण्यात आला आहे असे खासदार जाधव यांनी सांगितले. महसूल मंडळ व कृषि विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोट्यवधी रूपयाचा बोगस पिकविमा उचलून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोषीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी खासदार जाधव यांनी केली आहे.

Story img Loader