चंद्रपूर जिल्ह्य़ातील धक्कादायक चित्र
जनारोग्याशी खेळणारे या जिल्ह्य़ात ३९७ बोगस डॉक्टर्स असतांना आतापर्यंत कारवाई फक्त १८ जणांवरच करण्यात आलेली आहे. उर्वरीत बोगस डॉक्टर्स अद्यापही जिल्ह्य़ात सक्रीय असून जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व पोलिस दलातील विसंवादामुळेच कारवाईला विलंब होत आहे.
औद्योगिक जिल्हा,तसेच कामगारांची संख्या अधिक असलेल्या या जिल्ह्य़ात अशा डॉक्टरांची संख्या अंदाजे ६०० आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तयार केलेल्या यादीनुसार ३९७ बोगस डॉक्टर्स येथे सक्रीय आहेत. कुठलीही भीती न बाळगता आणि वैद्यकीय शिक्षण न घेता ते सारे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची धक्कादायक बाब आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या या यादीतून समोर आली. या यादीनुसार चंद्रपूर तालुक्यात १९ बोगस डॉक्टर्स आहेत. बल्लारपूर तालुका १५, भद्रावती २५, वरोरा १६, चिमूर ३०, मूल २७, सावली ३८, सिंदेवाही १८, नागभीड ४२, ब्रम्हपुरी ४२, गोंडपिंपरी ३८, पोंभूर्णा १६, राजुरा २०, कोरपना ४० व जिवती तालुक्यात १५ बोगस डॉक्टरांचा समावेश आहे. शैक्षणिकदृष्टय़ा प्रगतशील ब्रम्हपुरी तालुक्यात सर्वाधिक ४२ बोगस डॉक्टर्स असल्याचे बघून सर्वानाच धक्का बसला होता. त्यांच्याविरुध्द आरोग्य विभागाने संबंधित तालुक्याच्या पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारींच्या आधारावर पोलिसांनी धडक कारवाईचे अभियान सुरू केले आहे. आतापर्यंत फक्त १८ जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यानंतरही ३७९ बोगस डॉक्टर्स जिल्ह्य़ात कार्यरत आहेत. विशेष म्हणज,े यातील बहुतांश बोगस डॉक्टर्स कोरपना, जिवती, भद्रावती, वरोरा व राजुरा या तालुक्यांमध्ये आहेत. कारण, याच तालुक्यांमध्ये जिल्ह्य़ातील कामगारांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्याचाच फायदा ते घेत आहेत. दरम्यान, जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा पोलिस दलात योग्य समन्वय नसल्यामुळे डॉक्टरांवर कारवाई करण्यात अनेक अडचणी येत असून वेगाने कारवाया होताना दिसत नाही. त्याचाच परिणाम अजूनही ३७९ बोगस डॉक्टर्स कारवाईपासून दूर आहेत.
बहुसंख्य पदे रिक्त
डॉक्टरांविरुध्द कारवाई होत असली तरी ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांची बहुसंख्य पदे रिक्त आहेत. जिल्हा रुग्णालयात प्रथमश्रेणी डॉक्टरांची १५ पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागात डॉक्टर काम करायला तयार नाहीत. त्याचाच परिणाम इतक्या मोठय़ा संख्येने डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. यामुळे बोगस डॉक्टरांची संख्या कमालीची वाढली असून त्यामुळेच हा व्यवसाय चांगला बहारात आल्याचे चित्र आहे.