लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : बोगस शिक्षक पात्रता (टीईटी) प्रमाणपत्राच्या आधारे सोलापूर जिल्हा परिषदेत सेवेत असलेल्या पाच शिक्षण सेवकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी कठोर पाऊल उचलत सेवेतून बडतर्फ केले आहे.
२०२१ साली पवित्र पण पोर्टलच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात २७२ शिक्षण सेवक भरती झाले होते. त्यातील काही शिक्षण सेवकांचे शिक्षक पात्रता प्रमाणपत्रे बनावट असल्याची माहिती मिळाली असता त्यांची चौकशी करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने पुण्यातील सायबर पोलिसांकडून टीईटीधारक शिक्षण सेवकांच्या अहवाल मागविला. त्यात पाच शिक्षण सेवकांकडील शिक्षक पात्रता प्रमाणपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी संबंधित शिक्षण सेवकांना सेवेतून तडकाफडकी बडतर्फ केले आहे.
यापूर्वी २०१९ साली अशाच प्रकारे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील तीन शिक्षण सेवकांना बनावट शिक्षक पात्रता प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी बळकावल्याबद्दल बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा दुसरी कारवाई झाली तरी अजून काही संशयास्पद प्रकारांची चौकशी होणार असल्याचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले.