बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांनी २८ मार्च रोजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मागील काही दिवसांपासून गोविंदा राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर गोविंदाने शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी त्यांच्यांवर देण्यात आली. या पार्श्वभूमीवर अभिनेता गोविंदा हे आज (ता.५ एप्रिल) रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी दाखल झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी निवडणूक लढविण्याबाबत भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता गोविंदा काय म्हणाले?

“आम्ही आज निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करत आहोत. आज रामटेकच्या सभेत सविस्तर बोलेल. ही फक्त सुरुवात आहे. यश हे तुमच्या कर्तव्यावर अवलंबून असते. त्यामुळे मी जे विचार करुन आलो तसे व्हावे, अशी प्रार्थना करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर हा विश्वास टाकला. आता आम्ही जी सुरुवात केली, याचा डंका जगात वाजेल असा विश्वास आहे. शिवसेनेचा प्रचार हा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात पोहोचेल”, असे अभिनेता गोविंदा यांनी सांगितले.

हेही वाचा : हेमंत पाटील यांचं तिकिट कापलं गेल्यावर अयोध्या पौळ यांची खोचक पोस्ट, “जसा माझा श्रीकांत तसा हेमंत..”

गोविंदा निवडणूक लढविणार का?

अभिनेता गोविंदा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेकडून त्यांना मुंबईमधून उमेदवारी मिळेल, अशा चर्चा होत्या. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पक्षप्रवेशावेळी सूचक वक्तव्य करत कोणत्याही अटी शर्थींशिवाय गोविंदा यांचा शिवसेनेत प्रवेश झाला असल्याचे सांगितले होते. यानंतर आता याच विषयावर गोविंदा यांनीदेखील भाष्य केले.

गोविंदाने म्हटले, “मी निवडणूक लढवावी, यासंदर्भात आमची कोणतीही चर्चा झाली नाही. मी तिकीटदेखील मागितले नाही. मात्र, शिवसेना शिंदे गटाच्याबरोबर आहे. त्यांनी दिलेल्या या संधीबद्दल त्यांचे आभार मानतो. मी आतापर्यंत जो निश्चय केला तो पूर्ण झाला. आता मी शिवसेनेच्या प्रचाराला आलो आहे, त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार निश्चित विजयी होतील”, असे गोविंदाने म्हटले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor govinda on shivsena and lok sabha election 2024 gkt